किराणा मालाचे गोदाम फोडून १६ लाख असलेली तिजोरी पळविली

लातूर (प्रतिनिधी) : शहरातील लातूर-बार्शी महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाच्या परिसरात असलेल्या किराणा मालाचे गोदाम अज्ञात चोरट्यांनी फोडून १६ लाखांची रोकड असलेली तिजोरीच पळवली आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. यापूर्वीही हे गोदाम फोडल्याची घटना घडली होती. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पोलिसांनी सांगितले, लातूर-बार्शी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची, नगारिकांची वर्दळ असते. या महामार्गाच्या बाजूला असलेल्या पाच ते सहा फुट उंचीचे बांधकाम करुन त्यावर पत्र्याचे गोदाम उभारण्यात आले आहे. हे गोदाम एका कंपनीने भाडेतत्वावर घेतले आहे. या गोदामातून किराणा मालाचा पुरवठा केला जात होता.

दरम्यान, रात्री चोरट्यांनी गोदामाचा पाठिमागील पत्रा कापून आत प्रवेश केला. गोदामामध्ये १६ लाखांची रोकड ठेवण्यात आलेली तिजोरीच चोरट्यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास पळविली. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना बुधवारी सकाळी मिळाली. त्यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत पाहणी केली. घटनास्थळी तातडीने श्वानपथक तैनात करण्यात आले. या घटनेचा तपास विविध पोलीस पथकांकडून केला जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक डी.व्ही. गीते यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here