पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : दौंडजवळ नानविज फाटा येथे कोणार्क एक्सप्रेसमधील महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने लुटल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली. यात चोरट्यांनी एका प्रवाशालाही मारहाण केली.
पुण्याहून दौंडकडे जाणारी कोणार्क एक्सप्रेस काल रात्री ८.४५च्या सुमारास नानविज फाट्याजवळ आली तेव्हा सिग्नल नसल्यामुळे ती तिथे थांबली होती. यावेळी अंधारातून आलेल्या दोन ते तीन चोरट्यांनी गाडीच्या खिडकीत बसलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी एस-४ आणि एस-१ बोगीच्या खिडक्यांमध्ये बसलेल्या महिला प्रवाशांच्या गळ्यातील ११ तोळ्यांचे दागिने हिसकावले.
त्यांना प्रतिकार करण्यासाठी गाडीतून खाली उतरलेल्या एका प्रवाशालाही त्यांनी मारहाण केली. विशेष म्हणजे या चोरट्यांनीच सिग्नलच्या वायर कापून ही एक्स्प्रेस थांबवली होती. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून ते चोरांचा शोध घेत आहेत.






