बारामती येथे मित्राच्या पत्नीची अश्लील छायाचित्रे बनवणाऱ्या होमगार्डला अटक

बारामती (प्रतिनिधी) : छायाचित्रात छेडछाड करीत मित्राच्या पत्नीचे अश्लील फोटो तयार केल्याप्रकरणी पोलीसांनी हायटेक तपास करीत एका होमगार्डला अटक केली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडीक यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार अभिजित विजय हटकर (रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती) असे या होमगार्डचे नाव आहे. संबंधित महिलेने यासंबंधी फिर्याद दाखल केली आहे.

महिला हटकर याच्या मित्राची पत्नी आहे. त्यामुळे त्याचे तिच्या घरी येणे – जाणे होते. त्यातून त्याचा आणि मित्राच्या पत्नीचा संवाद झाला होता. त्याने तिचा मोबाईल क्रमांक मिळविला. या मोबाईल क्रमांकावर सोशल मिडीयाच्या मदतीने अश्लील शेरेबाजी केली. तसेच या महिलेच्या छायाचित्रात छेडछाड करत अश्लिल इमेज तयार केली. त्यानंतर ही छायाचित्रे त्याने तिच्या मोबाईल क्रमांकावर पाठवली. त्या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल,असे ‘मेसेज’पाठविले. त्यामुळे या महिलेने तात्काळ शहर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ सुत्र हलवत तपास सुरु केला. त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीने स्वत:चा मोबाईल क्रमांक बंद ठेवून देखील सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा पोलीसांनी शोध घेत त्याला अटक केली.

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोपाळ ओमासे, पोलिस नाईक किरण कदम, अतुल जाधव यांनी सायबर सेलची मदत घेत महत्वाची भुमिका बजावली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबुल केला. गुन्ह्यात वापरलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. तो सायबर फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक महाडीक यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here