कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्या अलनेश सोमजी, पत्नी डिंपल सोमजीला दिल्ली एअरपोर्टवर अटक

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वार्षिक २४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील अनेक नागरिकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या सोमजी दाम्पत्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या पोलिसांनी दिल्ली विमानतळावरुन ताब्यात घेतले आहे. सोमजी दाम्पत्य हे श्रीलंका मार्गे कॅनडला पळून जाण्याच्या तयारी होते, अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलनेश अकील सोमजी, डिंपल अलनेश सोमजी (दोघे रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) या दोन्ही आरोपींनी पुण्यातील अनेकांना वार्षिक २४ टक्के परतावा देण्याच्या बहाण्याने गंडा घातला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. शुक्रवारी (दि.२९ ऑक्टोबर) सोमजी दाम्पत्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. आज या दोघांना दिल्ली विमानतळावर इमिग्रेशनने ताब्यात घेतले. आरोपींना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतल्यानंतर याची माहिती पुणे पोलिसांना कळवण्यात आली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दिल्ली येथे रवाना झाले आहे. पथकाने कायदेशीर कारवाई करुन दाम्पत्याला ताब्यात घेतले असून त्यांना पुण्यात आणले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, अंमलदार सौदाबा भोजराव, अमोल पिलाणे, आशा कोळेकर, हेड कॉन्स्टेबल विजय गुरव, संग्राम शिनगारे, सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here