पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शहर आणि परिरासह इतर जिल्ह्यात वाहन चोरी करणाऱ्या सराईत दुचाकीचोरासह घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ३६ लाख रुपये किंमतीच्या ५१ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तपासादरम्यान मौजमजेसाठी आरोपींनी वाहन चोरी केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शंकर भिमराव जगले (वय-२० रा. हारगुडे वस्ती, चिखली पुणे), संतोष शिवराम घारे (वय-३९ रा. ओझर्डे, ता. मावळ) या दोघांना अटक केली असून, आरोपी संतोष घारे याच्यावर पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी, अहमदनगर व नाशिक येथे २०० वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर शंकर जगले हा घरफोडीच्या गुन्ह्यात फरार होता. त्याच्यावर वाहनचोरी, मोबाईल चोरी, घरफोडी, दरोड्याचा प्रयत्न असे सात गुन्हे दाखल आहे.
दरोडा विरोधी पथकाकडून वाहन चोरीच्या गुन्हाच्या तपास सुरु असताना तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे जास्त प्रमाणात घडल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांनी जवळपास ४५० हून अधीक सीसीटीव्ही तपासून वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना आरोपींची माहिती मिळाली. दोन व्यक्ती पवना हॉस्पिटल येथे येत असून ते या भागातले नसल्याची माहिती भांगे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपीं दुचाकीवरुन पळून गेले. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन उर्से गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना ताब्यात घेतले.
त्यांची चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याने त्यांची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरलेल्या दुचाकीबाबत माहिती दिली. पोलिसांनी पुणे शहर, पिंपरी, पुणे ग्रामीण, लोणावळा, व मावळ या वेगवेगळ्या भागातून ५१ दुचाकी, एक रिक्षा आणि एक मोबाईल असा एकूण ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस अंमलदार महेश खांडे, राजेंद्र शिंदे, राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, आशिष बनकर, प्रविण कांबळे, सागर शेडगे, प्रविण माने, राजेश कौशल्ये, गणेश कोकणे, औदुंबर रोंगे, गोविंद सुपे, समीर रासकर, विनोद वीर, अमर कदम, गणेश सावंत, सुमीत देवकर यांच्या पथकाने केली.






