युपी पोलिसांचे अनोखे एनकाउंटर चर्चेत; सातही आरोपींच्या पायावर एकाच ठिकाणी लागली गोळी

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) : उत्तर प्रदेशातील पोलिस आणि गुन्हेगारांच्या चकमकीच्या अनेक घटना समोर येतात. अशाच प्रकारची एक चकमक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांची गुरुवारी गौ तस्करांसोबत झालेली चकमक सध्या चर्चेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या बेहटा हाजीपूर परिसरातील एका गोदामात जनावरांची कत्तल केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच लोणी पोलिस गोदामात पोहोचले, तेथे काही लोक गुरे कापण्यासाठी जात होते. यादरम्यान तस्करांनी पोलिसांवर गोळीबार करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी सुमारे सात राऊंड फायर केले, तर प्रत्युत्तरात पोलिसांनी १६ गोळ्या झाडल्या. गोदामात वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसलेल्या आरोपींच्या पायाला गुडघ्याच्या खाली गोळ्या लागल्या. जखमी झाल्यानंतर आरोपींनी गोळीबार थांबवला आणि शस्त्रे खाली ठेवली, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

गुरुवारी लोणी सीमा पोलिसांची गौ तस्करांशी चकमक झाली. चकमकीत ७ गौ तस्कर पोलिसांच्या गोळ्यांनी जखमी झाले, त्यांना नंतर अटक करण्यात आली. तर, गौ हत्येत सहभागी असलेले दोन जण घटनास्थळावरुन पळून गेले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक पिस्तूल आणि धारदार शस्त्रेही सापडली आहेत. विशेष म्हणजे, जखमी झालेल्या सर्व तस्करांच्या पायावर एकाच ठिकाणी गोळी लागल्याने चकमकीवर मोठा प्रश्न उपस्थित होतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here