पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : अल्पवयीन मुलींवर पाळत ठेवून त्या शतपावली करीत असताना त्यांची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार मार्केट यार्ड परिसरात घडला. पोलिसांनी या प्रकरणी दोघा रोडरोमिओंना अटक केली आहे. त्यांनी दोन दिवसांत एकाच सोसायटीत राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींची छेड काढण्यात आली आहे.
सलग दोन दिवस हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी अनिकेत (वय २३) आणि मयुरेश (वय २३) या दोघांना अटक केली असून, यातील एक तरूण बेरोजगार आहे. तर एक जण खानावळीत वेटर म्हणून काम करतो. या प्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.
तक्रारदार मार्केट यार्ड परिसरातील एका बहुमजली इमारतीमध्ये राहतात. त्यांची ११ वर्षांची मुलगी आणि तिची मैत्रीण ही सोसायटीच्या परिसरात शतपावली करीत होत्या. त्या वेळी दोघा आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांची छेड काढली. त्यामुळे मुली घाबरल्या आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास देखील एका १३ वर्षीय मुलीला मॉर्निंग वॉक करताना त्या दोघांनी गाठले. ती मुलगी तेथून त्यांच्या सोसायटीत गेली. तेव्हा त्या दोघांनी सोसायटीच्या लिफ्टपर्यंत तिचा पाठलाग करून छेड काढली. पोलिसांकडे याबाबत तक्रार दिल्यानंतर मार्केट यार्ड पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक केली. त्यांच्यावर विनयभंगासह ‘पोक्सो’नुसार गुन्हा दाखल केला आहे.







