वडीलांशी मैत्री केली म्हणून बहिण-भावानं महिलेला केलं ‘खल्लास’

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : वडीलांशी मैत्रीचे संबंध असल्याच्या रागातून बहिण-भावाने एका महिलेला काठीने बेदम मारहाण करुन खून केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात घडली आहे. याप्रकरणी बहिण-भावा विरोधात फॅमिली डॉक्टरने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. सुनील पवार (रा. माळेगाव खुर्द) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश प्रमोद फडतरे व अनुजा प्रमोद फडतरे (रा. कसबा, बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी यांचे बारामतीमध्ये हॉस्पिटल असून संशयितांचे वडील प्रमोद उर्फ दादा नामदेव फडतरे हे मागील तीन वर्षापासून दारुचे व्यसन सोडवण्यासाठी त्यांच्याकडे येत. त्यामुळे त्यांचे फडतरे कुटुंबाशी कौटुंबिक संबंध आहेत. १० नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास अनुजाने त्यांना फोन करुन सांगितले की, वडीलांना एका महिलेसोबत जुन्या वाड्यात पकडले असून आम्ही दोघांनी तिला काठीने मारल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी अनुजाने फोन करुन सांगितले की, या महिलेचा श्वास चालत नाही, तिला ऋषिकेशने बारामती येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले असून, तेथील डॉक्टरांनी तिला मयत घोषीत केले. आम्ही तिच्या नातेवाईकांना तुमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. तुम्ही तिचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगा अशी विनंती केली.

यावर डॉ. सुनील पवार यांनी असे सांगण्यास नकार दिला. आरोपी मयत महिलेचा मृतदेह घेऊन डॉक्टर पवार यांच्याकडे आले. महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी त्यांनी शवविच्छेदन करुन घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. मयत महिलेच्या अंगावर कोणत्याही बाह्य प्रकारच्या जखमा नव्हत्या. केवळ नाकातून किरकोळ रक्त आले होते. मृत महिला घसरून पडून अटॅक आल्याचे आरोपींनी सांगितले. प्रमोद फडतरे यांनाही मारहाण झाली होती. मुलांनी खरी माहिती दिली नसल्याने त्यांनाही घातपाताची शंका आली नाही. यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी सर्वांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले.

दरम्यान, या घटनेत प्रमोद फडतरे यांनाही मार लागल्याने त्यांच्यावर डॉ. पवार यांच्या हॉस्पिटलमध्ये १९ नोव्हेंबरपर्यंत उपचार सुरु होते. त्यावेळी त्यांनीही मुलगा व मुलीने मारहाण केल्याचे सांगितले. सोमवारी (दि. २२) डॉ. पवार यांना महिलेच्या मृत्यूसंबंधी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी घटनेचा घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पोलिसांनी बहिण भावाकडे चौकशी केली असता त्यांनी मारहाण केल्याची कबुली दिली. तसेच मृत महिलेचा मोबाईल आणि वडिलांचे रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here