बुलंदशहर (उत्तरप्रदेश) : केस कापण्यास नकार दिला म्हणून एका तरूणाने आणि त्याच्या तीन भावंडांनी सलून चालकाचा गोळ्या घालून खून केला आहे. येथील शरीफपूर भंसरोली गावात घडलेल्या या घटनेने नागरिक हादरले आहेत. २५ वर्षीय तरूण मोहम्मद समीरने इरफान अली या सलून चालकाचा खून झाला असून, इरफानने त्याचे आणि त्याच्या तीन भावांचे केस कापण्यास नकार दिल्याच्या रागातून त्यांनी हे कृत्य केले. गुरुवारी समीरला पोलिसांनी अटक केली. या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचे इतर तिघे भाऊ हे फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या खळबळ उडवून देणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. इरफानच्या घरातून एक महिला धावत बाहेर पडत आहे. घरातून गोळीबाराचा जोरजोरात आवाज येत होता. तुम्ही गोळ्या घालू नका, अशी विनवणी शेजारी आरोपींकडे करत होते. मुख्य प्रवेशद्वाराजवळ चार भावंडांपैकी दोघे जण गोळीबार करत असताना या व्हिडिओत दिसत होते. तर दोघे भाऊ हे घराच्या टेरेसवर उभे असल्याचे या व्हिडिओत दिसते.
या घटनेने परिसर हादरून गेला. घटना घडली त्यावेळी घराजवळच राहणाऱ्यांपैकी कुणीही आपल्या घराबाहेर आला नाही. जोपर्यंत पोलीस आले नाहीत, तोपर्यंत कुणाचीही घराबाहेर येण्याची हिंमत होऊ शकली नाही, इतकी दहशत पसरली होती, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.
अगौता पोलीस ठाण्याचे प्रभारी अमर सिंह यांनी सांगितले की, चार आरोपींनी सुरुवातीला इरफानवर गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या इरफानचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा चुलत भाऊ इम्रान हा जखमी झाला आहे. त्याच्या पायावर गोळ्या लागल्या आहेत. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, समीरला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे तीन भाऊ फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






