वर्धा (प्रतिनिधी) : नाशिकमधील भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतांनाच येथे एका शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.
भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला गावातील उपसरपंच दिनेश बांते या शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. आहे. आधीच राज्यात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या होणाऱ्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापत असताना, यामध्ये आणखी एक भर पडली आहे. दवडीपार बेला गावातील उपसरपंच दिनेश बांते यांची काल रात्री दहाच्या सुमारास घरात घुसून हत्या करण्यात आली आहे.
आरोपींनी बांते यांच्या घरात घुसून धारदार चाकुने त्यांच्यावर सपासप वार केले आहेत. बांते घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर, मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने बांते यांना रुग्ण वाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. येथे गेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिनेश बांते यांना मृत घोषित केलं आहे.
या घटनेची माहिती भंडारा शहर पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. घराशेजारी राहणाऱ्या लोकांसोबत असलेल्या जुन्या भांडणातून सूड उगवण्यासाठी ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास भंडारा शहर पोलीस करत आहेत. मृत दिनेश बांते हे शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि दवडीपार बेला गावचे उपसरपंच होते. बांते यांच्या हत्येनं गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.






