अंतिम चित्रपटाचं तिकीट काढण्यास नकार दिल्याचा राग आल्याने तरुणावर चाकूहल्ला

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : अभिनेता सलमान खानचा चित्रपट ‘अंतिम’चं तिकीट काढून द्यायला नकार दिल्यानंतर एका तरुणाने चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. चित्रपटाचं तिकीट काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका तरुणाला आरोपीने स्वतःचं तिकीट काढण्याची सूचना केली. मात्र तरुणाने त्याला नकार दिल्यानंतर चाकूने हल्ला करून तो फरार झाला होता. मात्र आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


दिल्लीतील चांदनी महल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या चित्रपटाचं तिकीट काढण्यासाठी अजय नावाचा थिएटरबाहेर उभा होता. त्याचवेळी सैय्यद झियाउद्दीन नावाचा तरुण तिथे पोहोचला. आपल्यालाही सलमान खानच्या चित्रपटाचं तिकीट काढून दे, अशी धमकी सैय्यदने अजयला दिली. अजयने त्याला स्पष्ट नकार दिला. यावरून चिडलेल्या सैय्यदने स्वतःजवळचा धारदार चाकू बाहेर काढला आणि अजयवर वार केला. अजयचं पैशांचं पाकिट त्यानं हिसकावून घेतलं आणि तिथून पळ काढला.


थिएटरच्या परिसरात गर्दी असल्यामुळे ही घटना घडल्यानंतर नागरिकांनी चोर-चोर म्हणून ओरडायला सुरुवात केली. या परिसरात पेट्रोलिंगच्या ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना हा आरडाओरडा ऐकला आणि धावणाऱ्या तरुणाचा पाठलाग सुरू केला. काही वेळातच पोलिसांनी त्याला पकडलं. सैय्यद हा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलीस रेकॉर्डवरून दिसून आलं आहे. लूटमार आणि हल्ल्याच्या २६ केसेस त्याच्याविरोधात दाखल असून त्याने काही वर्षे तुरुंगाची हवादेखील खाल्ली आहे. दिल्ली पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here