डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील ३३ आरोपींविरोधात ८०० पानांचे दोषारोपपत्र

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : १५ वर्षांच्या मुलीवर ३३ नराधमांनी नऊ महिन्यांच्या काळात आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना २३ सप्टेंबर रोजी मानपाडा हद्दीत उघडकीस आली होती. राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेचा तपास जलद गतीने पूर्ण करून, मानपाडा पोलिसांनी कल्याण न्यायालयात ८०० पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. या गुन्ह्याचा तपास करताना १२१ साक्षीदारांचे जबाब नोंदवल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर जानेवारी महिन्यात तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. शरीरसंबंधांचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत, प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी २९ जानेवारी ते २२ स्पप्टेंबर या कालावधीत पीडितेवर डोंबिवलीसह अन्य ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी चार विशेष पथके स्थापन केली होती. गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन घटनेचा तपास स्थानिक पोलीस अधिकाऱ्याकडे न सोपवता ठाणे विभागाच्या महिला सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्याकडे सोपविला होता. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात ३७६, ३७६(एन), ३७६(३), ३६७(ड) (अ) सह पोक्सो कायदा कलम ६.६.१० प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

एखादा गुन्हा घडल्यावर तीन महिन्यांच्या आत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करावयाचे असते. बलात्काराच्या या गुन्ह्याप्रकरणी २३ सप्टेंबरला मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. दीड महिन्यातच पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली. मानपाडा पोलीस ठाण्यात २३ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तपास करून तात्काळ ३३ आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, असेही मोरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here