नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : रेल्वे तिकीट रद्द करण्यावरून सुरू झालेला छोटासा वाद टोकाला गेला आणि अवघ्या ३०० रुपयांसाठी तब्बल ११ वेळा अंगावर कार घालून नितीन शर्मा या ट्रॅव्हल एजंटची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनचं रिझर्व्हेशन रद्द करताना ३०० रुपये दंड घेतल्याच्या कारणावरून गावातील दोन भावांनी नितीन शर्माची हत्या केल्याचं समोर आलं आहे. गावात राहणाऱ्या नकुल आणि त्याचा भाऊ अरूण उर्फ छोटू या दोघांनी नितीनच्या अंगावर अकरावेळा गाडी घातली. या घटनेत जखमी झालेल्या नितीनचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. ग्रेटर नोएडाचे अधिकारी विशाल पांडे यांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणातील एक आरोपी नकुल याला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार जप्त केली आहे. फरार असलेल्या अरुणचा पोलीस शोध घेत आहेत.
नितीन आपल्या कुटुंबासह गावामध्ये राहत होता. तो एक मोबाईल दुकान चालवत होता आणि सोबतच ट्रेन तिकीट रिझर्व्हेशनचं कामही करत होता. साधारण एका आठवड्यापूर्वी गावातील नकुल आणि अरुण या दोन सख्ख्या भावांनी वैष्णवदेवीच्या दर्शनाला जाण्यासाठी ट्रेन तिकीट बुक करून घेतलं होतं. रविवारी रात्री दोघांनी नितीनकडून ट्रेनचं रिझर्व्हेशन रद्द केले. त्या बदल्यात नितीनने ऑनलाइन रिफंडमधून ३०० रुपये कापून घेतले. त्यामुळे संतापलेल्या दोन्ही भावांनी नितीनचा शोध घेऊन कासना गावाजवळ त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी नितीनजवळचे दोन मोबाईलही लुटले, अशी माहिती मृत नितीनचे वडिलांनी दिली.
आरोपींच्या तावडीतून कसातरी सुटून नितीन दुचाकीवरून आपल्या गावात पोहोचला. पाठलाग करत असताना आरोपींनी त्याच्या दुचाकीला कारने धडक दिली, त्यामुळे नितीन १०० मीटर अंतरावर जाऊन पडला. त्यानंतर त्यांनी नितीनच्या अंगावर वारंवार कार घातली. हा सर्व प्रकार घडत असताना त्याठिकाणी अनेक लोकांनी गर्दी केली होती. मात्र, कुणीही नितीनला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला नाही. काहींनी जखमी नितीनला रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयातून पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.






