जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : जुना खेडी रस्त्यालगतच्या ज्ञानदेवनगरातील महिनाभरापासून बंद असलेल्या घरात घरफोडी झाली. या घरफोडीत चोरट्यांनी कपाटातून सोन्याचे नाणे, दागिने चोरून नेले; मात्र त्याच कपाटात असलेले लक्ष्मी देवीचे चांदीचे नाणे शाबूत राहिले आहे. ही घटना ६ डिसेंबर राेजी उघडकीस अाली.
जुना खेडी रस्त्यालगत ज्ञानेश्वरनगरात असलेले अरुणा मानमोडे या ९ नोव्हंेबर रोजी दिल्ली येथे गेलेल्या आहेत. तेव्हापासून त्यांचे घर बंद होते. २८ नोव्हंेबर रोजी वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूनेही घर खाली केले होते. त्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घरात घरफोडी केली. ६ डिसंेबर रोजी त्यांच्या शेजारी असलेल्या महिलेच्या घरफोडी निदर्शनास आली. त्यांनी मानमोडे यांच्याशी संपर्क साधून घरफोडीबाबत कळवले. चोरीला गेलेल्या दागिन्यांबाबत खात्री केल्यानंतर मानमोडे यांचे वडील गोपाल नारायण दुबे (रा. नेपानगर) यांनी शनिपेठ पोलिसात फिर्याद दिली.
व्हिडिओ कॉल करून जाणून घेतली चाेरीबाबत माहिती
मानमोडे यांनी शेजारी महिलेच्या मोबाइलवर व्हिडिओ काॅल केला. चोरट्यांनी त्यांच्या घरातून ३० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे २ जोड व ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे असा एकूण ४५ हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचे निदर्शनास आले; मात्र या घरफोडीनंतरही कपाटात लक्ष्मी देवीचे चांदीचे नाणे शाबूत राहिले.






