सांगली (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्ज प्रकरणाचे काम पूर्ण करून देतो म्हणत एका सीएने महिलेशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या निराधारपणाचा फायदा घेत आरोपी CA ने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. आरोपीने 6 वर्ष पीडितेचं लैंगिक शोषण केलं आहे. चंद्रकांत चौगुले असं गुन्हा (FIR) दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे.
याप्रकरणी संबधित महिलेनं पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी, आरोपी चंद्रकांत चौगुले हा सांगलीतील विश्रामबाग परिसरातील सिल्व्हर ओक अपार्टमेंटमधील रहिवासी आहे.
तर पीडित महिला ही घटस्फोटित असून ती आपल्या दोन मुलांसह आईसोबत कोल्हापूर येथे राहते. पती सांभाळत नसल्याने पीडित महिलेने 2012 साली घटस्फोट घेतला होता. पतीपासून वेगळं झाल्यानंतर, त्यांना इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांना काही पैशांची गरज होती.
या कारणाने पीडित महिलेच्या एका परिचिताने सांगलीतील सीए चंद्रकांत चौगुले यांच्याबद्दल सांगितले. त्यानंतर पीडितेनं चौगुलेशी संपर्क साधला असता, त्याने कागदपत्रे घेऊन पीडितेला सांगलीला बोलावलं. यानंतर आरोपी विविध कारणं देऊन पीडितेला सतत सांगलीला बोलावू लागला.
दरम्यान एकेदिवशी आरोपी चौगुले याने पीडितेला घरी बोलावलं. यावेळी घरी कोणीचं नव्हतं. संधी साधत आरोपीनं पीडितेवर प्रेम असल्याचं सांगत लग्नासाठी मागणी घातली. परंतु, पीडितेनं नकार दिला. यानंतर आरोपीनं पीडितेवर जबरदस्ती करत अत्याचार केला. दरम्यान, आरोपी चौगुले याने 2012 ते 2018 या कालावधीत पीडित महिलेला बदनाम करण्याची धमकी देत अनेकदा अत्याचार केला.
पीडितेने 2018 साली आरोपीसोबत संबंध तोडल्यानंतरही तो त्रास देऊ लागला. तर, संबंध तोडल्यानंतर आरोपीने लैंगिक संबंधाची माहिती पीडितेच्या पतीलाही दिली.आरोपीच्या वारंवार त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.






