औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : दारू पिण्यासाठी सहाशे रुपये हिसकावण्यास विरोध केल्याने दोघा मद्यपींनी बबन धुराजी शिंदे यांचा खून केल्याचे उघड झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी बुलंद पोलीस टाइम्सशी बोलतांना दिली.
बीड बायपास परिसरातील सहारा सिटीच्या समोरील मोकळ्या जागेत बबन धुराजी शिंदे यांचा मृतदेह आढळून आला होता. चेहऱ्यावर जबर मारहाण करून त्यांचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता. मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला भला मोठा दगड सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनेच्या अनुषंगाने बारकाईने तपासाला सुरवात केली होती.
या परिसरातील सर्व हॉटेल, ढाबे, वाइन शॉप, पेट्रोल पंप, गॅरेजवर जाऊन माहिती घेतली. त्यानंतर धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी या प्रकरणी योगेश सर्जेराव खंडागळे , परमेश्वर बाबासाहेब खंडागळे या दोघांना अटक केली आहे. परमेश्वरला त्याच्या गावातून तर योगेशला वाळूज टोलनाका भागातून अटक केली. त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.
मृत बबन शिंदे तसेच आरोपी योगेश खंडागळे, परमेश्वर खंडागळे हे तिघेही दारू पिण्याच्या सवयीचे आहे. घटनेच्या दिवशी तिघांनी दारू प्राशन केली होती. त्या दिवशी मृत बबनकडे सहाशे रुपये होते. त्यामुळे आणखी दारू आणण्यासाठी पैसे दे म्हणून योगेश व परमेश्वरने आग्रह धरला, त्याला बबनने विरोध केला. त्यामुळे दोघांनीही पैसे हिसकावून घेतले, मात्र ही बाब सर्वांना सांगेल त्यामुळे बदनामी होईल म्हणून दोघांनी बबनच्या डोक्यात दगड घातला होता.






