ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेणाऱ्या पतीने सुऱ्याने पत्नीच्या पोटावर गळ्यावर वार तिची हत्या केली.तिच्यावर वार केल्यानंतर तिला जखमी अवस्थेत टाकून नजीकच्या वऱ्हाळ तलावात उडी मारून आरोपीनं आत्महत्या करणाचाही प्रयत्न केला. यानंतर संबंधित व्यक्तीला स्थानिकांनी पाण्यात उड्या मारून वाचवत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
आनंद वाघमारे असे पत्नीची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर मीना वाघमारे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरातील मिलिंद नगर या भागात राहणारा आनंद वाघमारे याचे कामतघर परिसरात मटण विक्रीचे दुकान असून त्याची पत्नी मीना ही सुद्धा त्यास त्याच्या व्यवसायात मदत करीत असे. या दरम्यान मागील काही दिवसां पासून आनंद हा आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने त्यांच्यात भांडण सुरू होते. मागील तीन दिवसांपासून हा वाद वाढत गेला. रविवारी सायंकाळी दोघे घराकडे जात असतानाच वऱ्हाळ देवी मंदिर परिसरात त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले.
यानंतर आनंद याने दारूच्या नशेत आपल्या सोबत असलेल्या पिशवीतील मटण कापण्याचा सुरा काढून पत्नी मीना हिच्या गळ्यावर पोटावर सपासप वार करून रक्तबंबाळ केले. याच अवस्थेत तिला तेथेच सोडून नजीकच्या वऱ्हाळ तलावात त्याने उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. तो पाण्यात गटांगळ्या खात असताना स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आशिष जाधव, नितीन आरकडे आपल्या मित्रां सोबत त्या ठिकाणी येत कुंदन सकट, संतोष नींगोले या युवकांनी पाण्यात बुडणाऱ्या आरोपीचा जीव वाचवून त्याला बाहेर काढले.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मनीष पाटील, महिला पोलीस उप निरीक्षक सायली शिंदे, पोलीस कर्मचारी शरद गोसावी उमेश सांबरे, पंडित जाधव हे घटनास्थळी दाखल होत त्यांनी आरोपीस ताब्यात घेतले. तसंच जखमी अवस्थेत पडलेल्या त्याच्या पत्नीला स्व इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता उपचार सुरु असताना पत्नी मीना हीचा मृत्यू झाला. दरम्यान शहर पोलीस ठाण्यात पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल करीत पती आनंद याला अटक केली आहे.






