प्रतापगड (उत्तर प्रदेश) : येथील रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. प्रतापगड जंक्शनच्या वेटिंग रूममध्ये बसलेली महिला जेव्हा शौचालयात गेली तेव्हा टॉयलेट ऑपरेटर अण्णाने महिलेवर बलात्कार केला. घटनेच्या वेळी महिलेचा पती काही वस्तू घेण्यासाठी वेटिंग रूमच्या बाहेर गेला होता.
प्रतापगड जंक्शनच्या वेटिंग रूममध्ये अंतू पोलीस स्टेशन परिसरातील एक महिला आणि तिचा पती ट्रेनची वाट पाहत बसले होते. महिलेचा पती सकाळी खाण्यापिण्यासाठी काहीतरी घेण्यासाठी बाहेर गेला. पण काही वेळाने परतल्यानंतर त्याला पत्नी न सापडल्याने त्याने शोधाशोध सुरू केली. स्टेशनचा परिसर पिंजून काढल्यानंतर ती शौचालयाला गेली तर नाही ना? असा विचार करून तो तेथे गेला असता, त्याला शौचालयात पत्नी बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळून आली. मोठ्या प्रयत्नानंतर तो पत्नीला शुद्धी आणल्यानंतर पीडित महिलेने तिच्यावर घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला. शौचालयात गेल्यावर तेथील कर्मचाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला आणि घटनास्थळावरून पळला, असे पीडितेने सांगितले.
दरम्यान, पीडित महिला वेटिंग रूममध्ये परतल्यानंतर तिला आरोपी दिसला. तसे त्या महिलेने पतीला सांगताच आरोपी आणि महिलेचा पती यांच्या भांडण झाले. आरोपीचे घर स्टेशनच्या बाहेरच असल्याने, वादाची माहिती मिळताच आलेल्या आरोपीच्या घरातील लोकांनी पीडीतेच्या पतीला बेदम मारहाण केली. यावेळी आरोपी संधी साधून पळून गेला.






