जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘पालकमंत्री ग्रामपंचायत विकास योजना’ च्या विशेष जन सुविधा अनुदान अंतर्गत प्रशासकीय मान्यता वितरण व घरकुल धारकांना जागा वाटप सोहळ्यात आपल्या खुमासदार व मिश्कील शैलीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, गावात देखील ‘जो काम करेगा वही गाव पे राज करेगा’ अशीच भूमिका येणाऱ्या काळात ग्रामस्थांनी घेणे गरजेचे आहे.. आमदार होणे सोपे असते मात्र कमी लोकांमधून निवडून येऊन सरपंच होणे कठीण असतं त्यामुळे निवडून आलेल्या सर्व सरपंचांवर देखील मोठी जबाबदारी आहे. ग्रामपंचायतीचे अनेक किस्से मिश्कीलपणे त्यांनी मांडून उपस्थितांचे मन जिंकली.
जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्च करण्यात जळगाव जिल्ह्याचा अहवाल क्रमांक राहिला आहे. यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणेने मेहनत घेऊन कामे मार्गी लावली आहे. गेल्या कालावधीत जळगाव जिल्ह्याने शाळांना संरक्षक भिंत ही अभिनव योजना राबवली या योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यात आपण बऱ्यापैकी यशस्वी झालो आहोत. मागील कालावधीत जळगाव जिल्ह्यातील जवळपास 500 शाळांमध्ये आपण संरक्षक भिंत उभारून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करून देऊ शकलो आहोत. पालकमंत्री ग्रामपंचायत विकास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या ग्रामपंचायतीची इमारत नसेल अशा ग्रामपंचायतींना सुसज्ज अशी 45 इमारती आपण मंजूर केल्या आहेत. यासाठी उत्कृष्ट इमारती उभ्या राहाव्यात म्हणून ग्रामपंचायतिना बक्षीसाची योजना देखील आपण केली आहे. या गावात ग्रामपंचायतीची इमारत सुंदर असेल ते गाव विकसित असते अशी त्याची ओळख निर्माण होते. गाव सुंदर करायचे असेल तर त्यासाठी सरपंचांनी देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे. असेही ते यावेळी म्हणाले.







