बॅनरवर नाही तर जमिनीवर विकास दिसला पाहिजे; गावच्या विकासासाठी एक व्हा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : गावाच्या विकासासाठी विरोधक व सत्ताधारी यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. गावचा विकास हा लोकांच्या मनात ठसला पाहिजे. त्यासाठी सरपंचासह सर्वांनी पुढाकार घेऊन मेहनत घेणे गरजेचे असते. बचत गटाच्या महिला अधिकाधिक सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी जिल्हाभर बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून सुसज्ज अशा मॉलचे निर्मिती करण्यात येत आहे. गावाचा विकास बॅनरवर नाही, तर जमिनीवर दिसला पाहिजे.” असं सांगून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केले.

 

ते जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘पालकमंत्री ग्रामपंचायत विकास योजना’ च्या विशेष जन सुविधा अनुदान अंतर्गत प्रशासकीय मान्यता वितरण व घरकुल धारकांना जागा वाटप सोहळ्यात बोलत होते. दिनांक 29 मार्च रोजी सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे होते.

यावेळी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आ. राजू मामा भोळे, आ. अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. डी. लोखंडे , जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे यांच्यासह इतर अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे व मान्यवरांच्या हस्ते जिल्हाभरातील ग्रामपंचायतचे सरपंच तसेच ग्रामसेवक यांना 45 ग्रामपंचायत भवन , 130 स्मशानभूमी बांधकाम, स्मशानभूमी पोहोच रस्ते अश्या विविध विकास कामांच्या योजनांच्या आदेश वाटप करण्यात आले. तसेच राज्य शासनाच्या सरळ सेवा भरती अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 कंत्राटी ग्रामसेवकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा भारातून सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य, महिला बचत गटाच्या सदस्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here