सातपुड्याच्या कुशीत गौण खनिज माफियांचा धुमाकूळ: अवैध उत्खननाने निसर्गाचे नुकसान

खनिज माफियांचा

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या लोहारा शिवारात गेल्या काही दिवसांपासून गौण खनिज माफियांनी धुमाकूळ घातला आहे. या भागातून भव्य आधुनिक मशिनरींच्या साहाय्याने अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन आणि वाहतूक जोरदारपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. स्थानिकांच्या मते, या बेकायदा कारवायांमुळे कित्येक ब्रास गौण खनिजांची चोरटी वाहतूक झाली असून, सातपुड्याच्या निसर्ग सौंदर्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

लोहारा शिवारातील हे अवैध उत्खनन थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले उचलली गेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळे जमिनीची धूप, पर्यावरणाचा ऱ्हास आणि जैवविविधतेचे नुकसान होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी या प्रकाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

या संदर्भात अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास नागरिकांना आहे. मात्र,जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत माफियांचे फावत असल्याचे चित्र आहे. निसर्गप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, सातपुड्यासारख्या संवेदनशील परिसरात अशा बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सरकारी मालमत्तांचे अशा प्रकारे अवैध उत्खनन व गौण खनिजांची वाहतूक करुन निसर्गाचे सौंदर्य समजले जाणाऱ्या सातपुडाला पोखरणाऱ्या माफियांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई आवश्यक व्हावी. या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here