मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. मुंबईच्या वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर धमकी पाठवण्यात आली असून त्यामध्ये असं म्हटलं आहे की, अभिनेत्याच्या घरात घुसून त्याला ठार मारलं जाईल. एवढंच नाही तर सलमान खानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकीही देण्यात आली आहे. वरळी पोलिस ठाण्यात फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाहीये, याआधीही अनेकदा अशाच धमक्या अभिनेत्याला मिळाल्या आहेत. अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोईकडून अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहाटे दोन जणांनी त्याच्या घराबाहेर गोळीबार केला तेव्हा हे सर्व सुरू झालं. यानंतर, अभिनेत्याच्या अगदी जवळच्या बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर प्रकरण गंभीर झालं. यानंतर सलमानभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याच्या घराच्या बाल्कनीत बुलेट प्रूफ ग्लासही बसवण्यात आला आहे.
दरम्यान, ‘सिकंदर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमानने या जीवे मारण्याच्या धमक्यांबद्दल मौन सोडलं. ‘सिकंदर’ या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, अभिनेता, त्याला सतत मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांबद्दल मीडियाशी बोलताना म्हणाला, ‘देवा, अल्लाह सर्वांपेक्षा अधिक आहे. माझं आयुष्य लिहिलेलं आहे. बस्स. कधीकधी तुम्हाला इतक्या लोकांना सोबत घ्यावं लागतं, हीच समस्या आहे.’







