नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षाकडून केला जात आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयात देखील हा मुद्दा गेला होता. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांचे आरोप फेटाळले होते. तसेच विरोधी पक्षांनी कोणत्याही प्रकारची लिखित तक्रार नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मतदार यादी पडताळणीतील अनियमिततेबाबत थेट सादरीकरण करत निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचा गंभीर आरोप केला आहे.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “निवडणूक आयोगाने आम्हाला कधीच डिजिटल डेटा दिला नाही.महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीमध्ये चोरी झाली. महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणूक हरलो. महाराष्ट्रामध्ये सुमारे ४० लाख मतदार रहस्यमय आहेत. येथे पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक नवे मतदार नोंदवले गेले. या मतदार यादीबाबत निवडणूक आयोगाने उत्तर दिले पाहिजे. हे मतदार खरे आहेत की खोटे हे निवडणूक आयोगाने सांगितले पाहिजे. आदित्य श्रीवास्तव नावाच्या एकाच व्यक्तीने कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केले आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधीनी केला.
पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्राचे निकाल पाहिल्यानंतर आमच्या शंकांना पुष्टी मिळाली की निवडणूक चोरी झाली आहे. मशीन रीडेबल मतदार यादी न दिल्याने निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून महाराष्ट्राची निवडणूक चोरली आहे अशी आमची खात्री पटली. अनेक ठिकाणी यादीत लोकांचे फोटो नाहीत. त्याचवेळी, अनेक ठिकाणी बनावट पत्ते लिहिले गेले आहेत. याशिवाय वेगवेगळ्या बूथच्या मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव आहे. मतदार यादीमध्ये अनेक लोकांच्या वडिलांच्या नावासमोर काहीही लिहिण्यात आलेले आहे” असे राहुल गांधी यांनी म्हटले.
राहुल गांधींनी यावेळी निवडणूक आयोगाला देखील दोन प्रश्न विचारले. ते म्हणाले की, “निवडणूक आयोग इलेक्ट्रॉनिक डेटा का देत नाही? आम्ही वारंवार आयोगाकडे डेटा मागितला पण तो आम्हाला देण्यात आला नाही. निवडणूक आयोगानेही आम्हाला उत्तर देण्यास नकार दिला. तसेच देशात बनावट मतदान होत आहे. ही चोरी पकडण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागला. या मतदार यादीत अनेक लोकांच्या वडिलांच्या नावासमोर काहीतरी लिहिले आहे. तीन वेळा मतदान केलेले ११ हजार संशयास्पद लोक आहेत. हे लोक कुठून येत आहेत? एकाच पत्त्यावर ४६ मतदार आहेत”, असेही त्यांनी म्हटले.







