जम्मू (वृत्तसंस्था) : किश्तवाड जिल्ह्यातील चोसिती गावाजवळ गुरुवारी भीषण ढगफुटी होऊन ४६ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून १६७ जणांना वाचवण्यात यश आले असून, अनेक जण ढिगाऱ्याखाली, चिखलगाळात अडकल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
किश्तवाड शहरापासून ९० किलोमीटरवरील चोसिती हे मचैलमाता मंदिराच्या मार्गावरील रस्त्याने जोडलेले शेवटचे गाव असून, या मंदिरात २५ जुलैपासून सुरू असलेल्या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक जमले असताना, गुरुवारी दुपारी १२ ते एकच्या सुमारास ढगफुटी झाली. मातीचा ढिगारा आणि पाण्याच्या लोंढ्याने अनेक घरांचे नुकसान झाले. वाचवण्यात आलेल्या ३८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी ‘एनडीआरएफ’, ‘एसडीआरएफ’, पोलिस, लष्कर आणि स्थानिकांंकडून मदतकार्य वेगाने सुरू आहे. दुर्घटनेनंतर यात्रा स्थगित करण्यात आली.
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घटनेबाबत माहिती दिली. ‘परिस्थिती गंभीर आहे. बचावकार्यासाठी सर्व बळ लावले आले आहे,’ असे त्यांनी शहा यांना सांगितले.







