जळगाव महानगरपालिका निवडणुकीकरिता अजिंठा विश्रामगृहातील महायुतीची बैठक फिसकटली

महायुती

जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) | जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती करण्यासाठी. रविवारी दि. २८ डिसेंबर रोजी सकाळपासून अजिंठा विश्रामगृह येथे बैठक सुरु होती. मात्र या बैठकीमध्ये महायुती एकत्र येण्याची चर्चा आता फिसकटलेली आहे. भाजप स्वबळावर लढणार असल्याचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. बैठकीनंतर तातडीने ना.गिरीश महाजन नाशिककडे रवाना झाले असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील अर्धवट बैठकीतून उठून रागारागाने निघून गेल्याची खात्रीलायक माहिती मिळालेली आहे.

भारतीय जनता पक्ष महायुती करुन महानगरपालिका निवडणुक लढेल असे काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रभारी असणारे आ. मंगेश चव्हाण यांनी सांगितले होते. मात्र शनिवारी ना. गिरीश महाजन यांनी आम्ही युती संदर्भात चर्चा करत आहोत, असे सांगितले. रविवारी मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण, आ.राजूमामा भोळे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामध्ये अजिंठा विश्रामगृह येथे चर्चा झाली.
या चर्चेमध्ये शिवसेनेकडून २५ जागांची मागणी करण्यात आल्याचे समजते. मात्र भाजपकडून शिवसेनेला १९ आणि राष्ट्रवादीला ६ अशा जागा देण्याबाबत सांगण्यात आले. शिवसेनेच्या आज २५ “विनिंग सीट” असल्यामुळे शिवसेना कडून हा प्रस्ताव अमान्य करण्यात आला. त्यामुळे आता महायुती फीस्कटल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
अपेक्षित जागा मिळत नाही म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील हे अर्धवट बैठकीतून उठून निघून गेले. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी चर्चा करून जागा वाटपाबाबत व तिकीट वाटताबाबत अंतिम चर्चा केली. यानंतर मंत्री गिरीश महाजन हे पुढील दाराने तर आ. मंगेश चव्हाण आणि आ. राजूमामा भोळे हे मागील दाराने विश्रामगृहातून कोणालाही न भेटता निघून गेले. भाजप आता ७५ जागा स्वबळावर लढणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झालेले आहे. मंत्री गिरीश महाजन हे कार्यालयातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे भेटी घेऊन लगेच रेल्वेने नाशिककडे रवाना झाले आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांना सायंकाळपर्यंत माहिती देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here