पारनेर (तालुका प्रतिनिधी सुनील लोणकर) । नूतन वर्षाच्या प्रारंभी १ जानेवारीला असणाऱ्या पहिलाच गुरुवार हा दिवस केवळ नवीन वर्षाचा प्रारंभ नव्हता, तर स्वामी समर्थांच्या कृपेचा साक्षात्कार घडविणारा ऐतिहासिक दिवस ठरला.
रांधे माळवाडी येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान ला अक्षरशः भक्तीच्या लाटांनी वेढले गेले. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या, मात्र संध्याकाळ सरकत गेली आणि भक्तसंख्या इतक्या वेगाने वाढत गेली की, अक्कलकोटची आठवण करून देणारे दृश्य येथे उभे राहिले. तब्बल ९० ते १०० किलोमीटर अंतर पार करून हजारो स्वामी भक्त या दिवशी दर्शनासाठी आले होते. डोळ्यांत श्रद्धा, ओठांवर नामस्मरण आणि मनात एकच भाव—“स्वामी आज काहीतरी देणार आहेत.” हा विश्वासच या महाकुंभाचे केंद्रबिंदू ठरला.
सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या “ स्वर स्वामी ” संगीत भजन मैफिलीने या गुरुवारी अक्षरशः दिव्यतेचा स्पर्श दिला. “ रडू नको बाळा मी पाण्याला जाते ” या भावगीताच्या गायिका शर्वरी टाव्हरे यांच्या भक्तिभावाने सुमधुर आवाजात सादर झालेली स्वामी गीते आणि भजने ऐकताना अनेक भाविकांचे डोळे पाणावले. संपूर्ण परिसर नामघोष, टाळ-मृदंगाच्या नादाने आणि भक्तिरसाने भारून गेला. हा कार्यक्रम पाहता अनेकांनी मनोमन म्हटले—
“आज स्वामी बोलत होते… गीतांतून!”विशेष बाब म्हणजे, या देवस्थानाच्या निर्मितीस अजून एक वर्षही पूर्ण झालेले नाही. तरीही आज येथे अनुभवणाऱ्या भाविकांची संख्या, त्यांना आलेले स्वामी अनुभव, त्यांच्या आयुष्यात घडलेले सकारात्मक बदल आणि समस्यांचे झालेले निरसन , यामुळे हे देवस्थान अल्पावधीतच महाराष्ट्रातील एक नामवंत अध्यात्मिक केंद्र बनले आहे. हे मंदिर तालुक्यापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण परिसरात श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरत आहे.कुठलेही राजकीय पाठबळ नाही, तरीही इतक्या मोठ्या प्रमाणावर भाविक स्वयंस्फूर्तीने येथे येत आहेत. अनेकांच्या मते, हे मानवी नियोजन नाही , हा स्वामी समर्थांचा जिवंत चमत्कार आहे .
सायंकाळी वाढलेल्या प्रचंड गर्दी ची व्यवस्था सांभाळणे, भाविकांची काळजी घेणे आणि महाप्रसादाचे नियोजन करणे , हे देवस्थानासाठी मोठे आव्हान होते. सुमारे ५,००० भाविकांसाठी नियोजित महाप्रसाद, मात्र प्रत्यक्षात त्याहून दुपटीने अधिक भक्त , या स्थितीतही व्यवस्था ढासळली नाही. परिस्थिती ही बिकट असतानाही क्षणभरही न खचता, पुन्हा नव्याने तेवढाच महाप्रसाद तयार करण्यात आला. देवस्थानच्या सेवेकरी मंडळींनीही अपार निष्ठेने जबाबदारी पार पाडली. अनेक सेवेकरी कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वयंप्रेरणेने पुढे सरसावले. गर्दी, धावपळ, ताण या सगळ्यातही कोणालाही त्रास न होता, संयम, शांतता आणि आपुलकी जपली गेली.
अनेक भाविक म्हणत होते इथे गर्दी होती, पण गोंधळ नव्हता… कारण स्वामी स्वतः व्यवस्था पाहत होते. आता सर्वांचे लक्ष येणाऱ्या मार्च महिन्यात होणाऱ्या श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्याकडे लागले आहे. दि १९ व २० मार्च मध्ये येथे होणारी भव्य-दिव्य यात्रा पारनेर तालुक्यातील एक मोठी ऐतिहासिक यात्रा ठरेल, असा विश्वास श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अनिल आवारी यांनी व्यक्त केला. या यात्रेसाठी राज्यभरातून स्वामी भक्त येतील,अशी भावना त्यांनी मांडली.यात्रेच्या नियोजनासाठी सुसज्ज अशी टीम उभी करण्यात येत असल्याची माहिती देवस्थान अध्यक्ष सुभाष भोसले यांनी दिली. पारनेर तालुक्यातील अनेक गावांमधून स्वामी सेवेकरी देवस्थानाशी जोडले जात असून, लवकरच व्यवस्थापन समितीचा विस्तार करण्यात येणार आहे.
या रांधे माळवाडी येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान हे आता केवळ एक मंदिर न राहता, श्रद्धा जागवणारे, सेवा शिकवणारे आणि अनुभव देणारे अध्यात्मिक तीर्थक्षेत्र बनत चालले आहे. नूतन वर्षातील पहिलाच गुरुवार त्याचा साक्षीदार ठरला.
गुरुवारचे महाप्रसाद सेवेकरी अमोल भंडारी, राहुल भंडारी, तुषार भंडारी, किरण भंडारी, संदीप गहाणडूले, सचिन मोरे, विकास बोचरे,अविनाश बोचरे , तर संपूर्ण दिवसाची प्रसाद सेवा दिवंगत दीपक मेहेर यांच्या स्मरणार्थ श्रीमती धनश्री मेहेर यांच्या वतीने देण्यात आली. हा देवस्थानचा नवीन वर्षातील पहिलाच उपक्रम ठरला.
अविनाश लाळगे, प्रभाकर खैरे , दिलीप आवारी, पोपट आवारी, गोरख आवारी, विठ्ठल आवारी, दत्तात्रय बाबर , प्रशांत पवार , अनिल गाडगे, विजय शिरोळे, संतोष आवारी, अवि गोरडे, संदीप गहाणडूले, रवी दवे, प्रतीक कापसे, सुधीर परंडवाल, मनोहर परंडवाल, सुरेश आवारी, योगेश जोरी, वैष्णव जगदाळे, सतीश लामखडे, विलास काटे, रवी पावडे, रावसाहेब भदे, लखन उचाळे, गोपाळा आवारी, सखाराम भंडारी, किसन शिंदे, दीपक मावळे, सचिन मोरे, अक्षय राजेंद्र आवारी, संपत आनंथा पावडे, सुनील गावडे, राहुल साबळे , किरण आवारी, लहू गागरे,भीमा लामखडे, किशोर कुंभकर्ण व असंख्य स्वामी भक्तांनी या दिव्य सोहळ्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले.







