कोट्यवधींचा निधी खर्चूनही योजना अपूर्ण; निकृष्ट कामाचा आरोप, तांत्रिक चौकशी व कारवाईची मागणी
भडगाव (तालुका क्राइम रिपोर्टर अमीन पिंजारी) | शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, कजगाव ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक सोनवणे यांनी पाणीपुरवठा योजनेतील कथित अनियमितता, अपूर्ण कामे आणि निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि. ८) जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उपोषणास सुरुवात केली आहे.
कजगावकरांना शुद्ध व नियमित पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, एवढा मोठा निधी खर्च होऊनही पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्णत्वास गेलेली नसल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा निधी नेमका कुठे आणि कशासाठी खर्च झाला?, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या काही कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा गंभीर आरोपही सोनवणे यांनी केला आहे. पाणीपुरवठा योजनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून स्वतंत्र व निष्पक्ष तांत्रिक तपासणी करण्यात यावी, कामाची गुणवत्ता तपासण्यात यावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.
विशेष म्हणजे, योजनेच्या कामाबाबत यापूर्वीही संबंधित प्रशासनाकडे तक्रारी व मागण्या करण्यात आल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसावे लागले, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
कागदावर योजना, प्रत्यक्षात पाण्यासाठी वणवण?
जलजीवन मिशनचा मूळ उद्देश प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध व नियमित पाणी पोहोचविणे हा आहे. मात्र, कजगावमध्ये योजनेचे काम अपूर्ण राहिल्यास या योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचा आरोप होत आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिकांना अपेक्षित पाणी मिळत नसेल, तर योजनेच्या कामाची गुणवत्ता आणि अंमलबजावणी याबाबत प्रशासनाने गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अशी भूमिका सोनवणे यांनी मांडली आहे.
कजगावमधील नागरिकांना शासनाच्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, झालेल्या कामाची तांत्रिक पद्धतीने सखोल तपासणी करावी आणि शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला आहे की नाही, याची पडताळणी करावी, या मागण्यांसाठी सोनवणे यांनी उपोषण सुरू केले आहे.
आता प्रशासन काय भूमिका घेणार?
एका बाजूला कोट्यवधींचा निधी, दुसऱ्या बाजूला अपूर्ण पाणीपुरवठा योजना आणि नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नावरून सुरू झालेले उपोषण, यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सोनवणे यांच्या आरोपांची प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणली जाणार का? दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का? आणि कजगावकरांना प्रत्यक्षात नियमित व शुद्ध पाणी कधी मिळणार? याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.







