यावल (जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे) | जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात महावितरणच्या विद्युत वाहिन्यांच्या अॅल्युमिनियम तारा आणि शेतकऱ्यांच्या विहिरीवरील कॉपर केबल चोरी करणाऱ्या एका सराईत रेकॉर्डवरील चोरांच्या टोळीचा यावल पोलिसांनी यशस्वी पर्दाफाश केला आहे.
या कारवाईत १० आरोपी व १ विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकासह एकूण ११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या कारवाईत ६ लाख ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
महावितरणच्या तारा व कृषिपंपांच्या केबल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक यांनी कडक पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री किनगाव ते मालोद रोडवर काही इसम संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी सुपडू हमजान तडवी (रा. मालोद) आणि आरिफ युसुफ मणियार (रा. किनगाव बुद्रुक) यांना स्विफ्ट कारसह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सुपडू तडवी हा या संपूर्ण चोरीच्या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे व त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मालोद व नायगाव परिसरातील एकूण १० सराईत आरोपींना अटक केली. तसेच आरिफ मणियार याने चोरलेला माल जळगाव येथील भंगार व्यावसायिक इस्माईल उर्फ लालू मुसा पटेल यास विकल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याच्याकडूनही १७५ किलो अॅल्युमिनियम तार जप्त केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी स्विफ्ट कार, बजाज प्लॅटिना मोटारसायकल, २४० किलो अॅल्युमिनियम तार, २ पाण्याचे सबमर्सिबल पंप, २०० फूट कॉपर केबल व कटर असा एकूण ६ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावल पोलीस ठाण्यात या चोरांच्या विरोधात भारतीय विद्युत कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व त्यांच्या पथकाने पार पाडली आहे.







