सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | सोलापूर ग्रामीण पोलीस दल आणि स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम उघडली असून, कुर्डुवाडी शहरात विक्रीसाठी मेफेड्रोन (MD) ड्रग घेऊन येणाऱ्या एका संशयितास जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ६३ ग्रॅम एमडी ड्रग्ससह चारचाकी वाहन आणि मोबाईल असा एकूण ९ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांवर कडक कारवाई करण्याबाबतच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, कुर्डुवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करमाळा रोडवरून एक व्यक्ती मेफेड्रोन ड्रग विक्रीसाठी घेऊन येत आहे.
या माहितीच्या आधारे कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करमाळा रोडवरील बौद्ध विहारजवळ सापळा रचून थांबले. काही वेळानंतर मिळालेल्या वर्णनानुसार एक चारचाकी वाहन येताना दिसले. पोलिसांनी खात्री करून संशयित आरोपी सोहेल अमर मुलाणी (वय २८, रा. खाटीक गल्ली, कुर्डुवाडी) याला जागीच पकडले.
आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख ८९ हजार रुपये किमतीचे ६३ ग्रॅम मेफेड्रोन (MD) हे अंमली पदार्थ आढळले. तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली होंडा कंपनीची BR-V चारचाकी आणि मोबाईल असा एकूण ८ लाख रुपयांशिवाय एकूण ९ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी आरोपी सोहेल अमर मुलाणी याच्याविरुद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये (गु.र.नं. ४२६/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता २ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास कुर्डुवाडी पोलीस करीत आहेत.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, प्रेरणा कट्टे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस., पोलीस निरीक्षक संजय जगताप, व पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कुर्डुवाडी पोलीस ठाण्याच्या पथकातील अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी पार पाडली.







