ढवळस येथे ‘एक गणेशोत्सव – एक हरित संकल्प’; श्री गणेश आरतीनंतर उत्साहात वृक्षारोपण

एक गणेशोत्सव - एक हरित संकल्प

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | गणेशोत्सव २०२६ च्या निमित्ताने धार्मिक उत्सवासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथे ‘शिवरत्न गणेश उत्सव तरुण मंडळा’च्या वतीने श्री गणेश आरती व वृक्षारोपणाचा उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. गणेशभक्तीला सामाजिक बांधिलकीची जोड देत मंडळाने राबवलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यासाठी विविध हरित उपक्रम राबवले जात आहेत. याच मोहिमेअंतर्गत मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे व पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ढवळस येथे या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिवरत्न गणेश उत्सव तरुण मंडळाच्या श्री गणेशमूर्तीची महाआरती मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे व पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. आरतीनंतर लगेचच उपस्थित अधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, केवळ झाडे लावून न थांबता त्यांचे नियमित संगोपन, निगा व पाणी देण्याची जबाबदारी घेण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला.एक गणेशोत्सव - एक हरित संकल्प

कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर म्हणाले, “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव व्हावा. निसर्गाचे सौंदर्य व समतोल टिकवण्यासाठी तरुणांनी वृक्षारोपणात पुढाकार घेणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.”  आरती व वृक्षारोपणानंतर शिवरत्न तरुण मंडळाच्या वतीने दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

“गणपती बाप्पाच्या भक्तीसोबत निसर्गाचीही भक्ती करूया… एक गणेशोत्सव – एक हरित संकल्प!” या मंत्रासह ढवळस परिसरात पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. याप्रसंगी शिवरत्न गणेश उत्सव तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ढवळस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here