सीमेवर तणाव वाढला; लष्करप्रमुख नरवणे लडाखमध्ये दाखल

नवी दिल्ली – भारत आणि चीन दरम्यान प्रत्यक्ष ताबारेषेवर (एलएसी) तणावस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे आज अचानक दोन दिवसांच्या लेह दौऱ्यावर पोहोचले.
पूर्व लडाख परिसरातील पेगोंग त्सो परिसरात चिनी सैनिकांच्या घुसखोरीचा प्रयत्न गेल्या सोमवारी भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. पूर्व लडाखमध्ये पेगोंग त्सो परिसराजवळ उभय देशाचे सैनिक २९ ऑगस्टच्या रात्रीपासून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. चिनी सैनिकांनी त्यांची सीमा ओलांडत भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केल्याने भारतीय जवानांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले.
याआधी दोन्ही देशांदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर देखील पूर्व लडाखमधील तणाव निवळलेला नाही. उभय देशांमध्ये सध्याच्या तणावपूर्वक स्थितीसंबंधी समाधानकारक तोडगा निघालेला नाही. चीनने एप्रिल पूर्वीची स्थितीचा आदर करीत ती बहाल करावी, असा आग्रह भारताचा आहे. लष्करी स्तरावरील चर्चेसह परराष्ट्र मंत्रालय तसेच दोन्ही देशाच्या वर्किंग मॅकेनिज्म फॉर कंसल्टेशन अँड को-ऑर्डिनेशन स्तरावरही चर्चा करण्यात आली आहे. दोन्ही देशांकडून ‘कंप्लीट डिसइंगेजमेंट’च्या दिशेने पावले उचलण्यास नेहमी सहमती दर्शवली आहे. पंरतू,हे अद्यापही प्रत्यक्षात अंमलात आलेले नाही.
या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या दौऱ्यात आर्मी प्रमुख जनरल नरवणे सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सध्यस्थितीवर चर्चा करणार आहे. तसेच सैन्य सज्जतेचा ते आढावा घेणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here