मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : अभिनेता अक्षय कुमारचा ‘गोरखा’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. या फर्स्ट लुकची सोशल मीडियावर चर्चा आहे. अशातच माजी लष्कर अधिकारी मेजर माणिक एम. जोली यांनी या पोस्टरमधील एक चूक निदर्शनास आणून दिली आहे. ही चूक गंभीर असून याप्रकरणी लक्ष द्यावे, असा सल्लाही मेजर जोली यांनी अक्षयला दिला आहे.
अक्षयचा चित्रपट भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटच्या पाचव्या गोरखा रायफल्सचे मेजर जनरल इयान कार्डोझो यांच्या जीवनावर आहे. अक्षयने ‘गोरखा’चा फर्स्ट लुक शेअर केल्यानंतर ते पोस्टर गोरखा रायफल रेजिमेंटचे अधिकारी मेजर माणिक एम. जोली यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केले.
या ट्विटमध्ये मेजर जोली यांनी लिहिलंय, ‘प्रिय अक्षय कुमार, मी एक माजी गोरखा अधिकारी आहे. तुम्ही या चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो, पण तुम्हाला एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील खुकरी ही व्यवस्थित दाखवावी. खुकरी हे एक धारदार शस्त्र्ा असून त्याची धार ही आतील बाजूला असते. ही तलवार नाही, तर खुकरी आहे, जिचा वार आतील बाजूने होतो. यासाठी मी तुम्हाला खुकरीचा एक फोटोही पाठवत आहे.’ मेजर जोली यांनी ही चूक दाखवल्यानंतर अक्षयने तत्काळ पोस्टवर कमेंट करत चित्रीकरण करताना काळजी घेऊ, असे सांगितले.






