अफाट कर्तृत्व व निर्मळ स्वभावाचे धनी टोणगावकरनाना

(हिमांशु शाह, अध्यक्ष, श्रीमती मंदाकिनी टोणगावकर रोटरी इंग्लिश स्कुल, दोंडाईचा)
शब्दांकन – दोंडाईचा (संतोष कोळी)
मी स्व.नानांबद्दल काही सांगणे म्हणजे सूर्यासमोर दिवा लावणे असे आहे. नाना, ताई व परिवाराशी लहानपणा पासून संबंध , त्याचबरोबर आई वडिलांकडून नानांच्या आई वडिलांबद्दलही भरपूर गोष्टी ऐकायचो, त्यामुळे त्या परिवाराबद्दल एक वेगळेच स्थान मनात निर्माण झाले होते. त्या आदरपूर्ण भावनेमुळे रोटरी व शाळेमुळे अधिक जवळचा संबंध आल्यावरही नानांसमोर एकदम बोलण्यास थोडा अडखळायचो हे मला अजून आठवते. त्यांच्या अफाट कर्तृत्वामुळे व निर्मळ स्वभामुळे त्यांची प्रत्येक गोष्ट माझ्याच काय पण परिसरातील प्रत्येकासाठी आदर्श होती. बाहेरगावी दोंडाईचाची ओळख टोणगावकरनाना अशीच झाली होती , दोंडाईचा म्हटले की डॉ. टोणगावकरांचे का? असेच विचारले जाते. गोल्ड मेडालीस्ट शल्यविशारद व प्रेरणादायक व्यक्तिमत्व असलेले नाना दोंडाईच्यात स्थायिक झाले हे त्यांनी दोंडाईचेकरांवर उपकारच केले. गोरगरिबांसह सर्वांना उच्च वैद्यकीय सेवा देत राहिले , त्याच विचारातून हार्निया जाळीवर सखोल संशोधन करून अत्यल्प किमतीच्या हार्निया जाळीचा शोध लावला. त्याची आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून जगभरातील गरिब रुग्णांची सोय केली. त्यांच्यामुळे दोंडाईचाला आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण झाली. त्यांना शासनाचा ‘आनंदीबाई जोशी ‘ पुरस्कार , रोटरी इंटरनॅशनलचा अत्यंत मानाचा ‘सर्व्हिस अबोव्ह सेल्फ ‘ पुरस्कार , मेडिकलच्या प्रतिष्ठित जर्नल मध्ये नोंद , दोहा व जर्मनीतील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सम्मेलनात आमंत्रित स्पीकर, जागतिक कीर्तीचे हार्निया संशोधक , असे बरेच प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले , तर ग्रामीण भागातील रुग्णांना सुलभ रक्त पुरवठ्यासाठी दिल्लीपर्यंत लढणारे डॉक्टरचे बिरूद मिळाले . पण त्यांना याचा कोणताच गर्व नव्हता, एकदम साधे , सरळ व त्यामुळेच सर्वांना त्यांचाबद्दल प्रचंड आदरयुक्त श्रध्दा होती. त्यांच्या प्रत्येक लहान सहान बाबतीत चिकित्सक वृत्तीमुळे आणि निस्वार्थ व समजावून सांगण्याच्या स्वभावामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला, विचाराला मान होता , मग तो वैद्यकीय क्षेत्राबद्दल असो की श्रद्धा-अंधश्रद्धा असो की अध्यात्माविषयी विचार असो, कोणत्याही विषयांचा गहन अभ्यास केल्यावरच ते त्या बद्दल त्यांचे विचार मांडायचे. शस्त्रक्रिया असो की अजून काही समस्या, नाना लगेच सोडवायचे. अर्थातच डॉ. राजेशदादा, डॉ. ज्योत्स्नाताई हे नानांचे सेवाकार्य आ. डॉ. आशाताईंच्यासोबत चालवतच आहेत व हीच परिसराच्या लोकांसाठी दिलासा देणारी गोष्ट आहे.
बऱ्याच वेळा त्यांच्याकडे गेलो की ते अभ्यास करीत असलेले, लिहित असलेले मटेरीअल दाखवायचे, काय वाचतायत व कसे लिहित आहेत ते समजवायचे , तेव्हा एकदा असाही गर्व वाटायचा की एव्हढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्ती बरोबर बसून बोलतोय. त्यांनी भगवत गीतेचा सखोल व वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यास केला होता, त्यातील संस्कृत श्लोक त्यांचे तोंडी पाठ होते व ते नेहमी भाषणांमध्ये गीतेतील तत्वज्ञान सांगायचे, श्लोक म्हणायचे व सांगायचे की ते जरी अंधश्रद्धा विरोधी असले तरीही गीतेतील गोष्टी वैज्ञानिक व तार्किक आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तकं तर मी नात्यातील, ओळखीच्या डॉक्टरांना दिली आहेत . माझ्या आईने तर त्यांची सर्व पुस्तके वाचून काढली आहेत व वाचतांना रोज त्यातील बरेच मुद्दे, कठीण प्रसंग आम्हाला आवर्जून सांगायची, चर्चा व्हायची, आमचे वडीलही तशा काही प्रसंगातून गेलेले होते. नानांनी प्रत्यक्ष ऑटोग्राफ करून दिलेले पुस्तक तर आता कायम स्वरूपी संग्रहित राहील. माझ्या पहिल्या वाढदिवसाचे त्यांच्या सोबतचे फोटो अजूनही माझ्या संग्रही आहेत. माझ्या माहिती प्रमाणे कोरोना लॉकडाऊन काळात नाना क्वचितच कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित होते, त्यातील रोटरी सनराइजचे पदग्रहण व श्रीमती मंदाकीनी टोणगावकर रोटरी इंग्लिश स्कूलच्या 10वी तील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळ्यास ताईंसह, या दोन्ही वेळा भेटणे-बोलणे झाले.
नाना दोंडाईचातील रोटरी चळवळ व रोटरी शाळेचा भक्कम आधारस्तंभ होते. कुठल्याही अडचणीत मार्गदर्शक असायचे व अजून मोठे कार्य करायला प्रेरणा द्यायचे. श्रीमती मंदाकिनी टोणगावकर रोटरी इंग्लिश स्कूलच्या जडणघडणात त्यांचा व कुटुंबाचा मोठा आधार आहे व त्यामुळेच एक छोटे रोपटे आज एका मोठ्या वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. शाळेबाबतच्या आपुलकीमुळे त्याबद्दल कोणतीही गोष्ट, चर्चा करायला भेटायचे आहे म्हटल्यावर लगेच भेटायला बोलावून घ्यायचे व मिटिंग मध्येही आवर्जून उपस्थित राहायचे. शाळेतील विद्यार्थ्यांबाबतीत त्यांना फार कौतुक असे. या वर्षीही दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यास आशाताईंसोबत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. तसेच प्रत्येक वर्षी शाळेच्या वार्षिक स्नेह सम्मेलनास आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रम संपला की ताईंना व आम्हाला ‘अरे, सर्वांसोबत जसे येईल तसे नाचल्याने सर्व टेन्शन दूर होते, चल स्टेज वर ….’ करून ओढून न्यायचे व त्यानंतर सर्व विद्यार्थी, स्टाफ सोबत मंचावर शेवटचा धमाल डान्स व्हायचाच व पुढे तशी परंपराच झाली. आम्ही व शाळा नानांच्या जाण्याने पोरके झालो आहोत, नाना आम्हा प्रत्येकाच्या हृदयात मार्गदर्शक व आधार म्हणून कायमस्वरूपी राहतील.
नाना असे आपल्यातून गेलेत हे अजूनही मनाला पटत नाही . जेव्हा राजेशने सांगितले ‘हे सर्व रिव्हर्सिबल आहे’ त्यामुळे नाना थोड्या दिवसातच बरे होऊन परततील, तेव्हा त्यांना कसे व केव्हा भेटता येईल, बोलता येईल यावर काल पर्यंत डोक्यात विचार चालायचे. पण आज थोडा सावरलो व हे काही लिहू शकलो. काल नानांबद्दल बऱ्याच पत्रकार मित्रांनी प्रतिक्रिया विचारल्या , पण त्या बाबत काहीही विचार करायला मनच तयार होत नव्हते. बराच प्रयत्न केला पण अर्ध्यात सोडून द्यावे लागायचे. आता तर नाइलाजास्तव वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल.
आदरणीय नानांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली ….!! तुमच्या सारख्या व्यक्तीला आम्ही भेटत होतो ह्या गोष्टीचाच आम्हाला गर्व राहील ….!!

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here