शिक्रापूर (पुणे) – शिरूर तालुक्यातील शिक्रापूरमधील हिवरे रोड परिसरात अल्पवयीन युवतीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाणयात अत्याचार करणाऱ्यासह त्याला मदत करणाऱ्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक उर्फ दत्तात्रय कुंडलिक ठोंबरे व त्याचा मित्र गणेश शिंदे (पूर्ण नाव माहित नाही, दोघे रा. वाघोली ता. हवेली) यांच्या विरुद्ध बलात्कार, दमदाटी तसेच बाल लैंगिक अत्याचार आदी गुन्हे दाखल केले आहेत. शिक्रापूर येथील या अल्पवयीन युवतीच्या घरी दीपक ठोंबरे हा नेहमी येत होता. यात दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर दीपक वेळोवेळी युवतीशी शारीरिक जवळीक करू लागला. एकदा त्याने युवतीला आपण मॉलमध्ये फिरायला जाऊ असे सांगून पुण्यात लॉजमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला.
यानंतर वारंवार युवतीवर अत्याचार करत राहिला. ही बाब युवतीने तिच्या आई वडिलांना सांगितली. घरच्या लोकांनी गावातील व नात्यातील लोकांची बैठक घेत बदनामी नको म्हणून तक्रार न देता दीपकला समजावून सांगितले. त्यांनतर देखील दिपक हा वेळोवेळी युवतीच्या मैत्रिणींच्या मोबाईल वर संपर्क करून युवतीला त्रास देत राहिला. दिपक याने त्याचा मित्र गणेश शिंदे याचे मदतीने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून हडपसर येथे घेऊन जात युवतीला तुझे कोठे लग्न होऊ देणार नाही, तू ऐकले नाही तर तुझ्या आई वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली.
तेथे गणेश शिंदे याचे ओळखीच्या एका महिलेच्या मदतीने युवतीला हडपसर पोलीस स्टेशन येथे घेऊन जाऊन आई वडिलांच्या विरोधात बोलण्यास सांगितले त्यावेळी युवतीने तेथील पोलिसांना मला वडिलांकडे जायचे आहे, असे सांगितले. तेथील पोलिसांनी युवतीच्या वडिलांना फोन करून बोलावून घेत युवतीला त्यांच्या ताब्यात दिले. युवतीने घडलेला प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला; मात्र त्यानंतर देखील दीपक व त्याचा मित्र गणेश यांच्या गाड्या पीडित युवतीच्या घराच्या आसपास फिरत असल्याने युवती भयभीत झाली आणि पिडीत युवतीने याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.







