- शनिवारी 25 बळी; बाधितांचा आकडा प्रथमच हजारी पार
- आरोग्य संचालिका डॉ.साधना तायडे यांनी घेतला आढावा
- जम्बो हॉस्पिटलची तयारीची माहिती घेतली
- जिल्हा रुग्णालय, फलटण येथे दिल्या भेटी
- बाधितांनी गाठली 23 हजारी; आज दिवसभरात 630 जणांना दिला डिस्चार्ज
सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – कोरोनाचा अक्षरशः जिल्ह्यात महाउद्रेक सुरू आहे.दररोज बाधित रुग्ण औषध उपचार योग्य पद्धतीने न मिळल्याने दगावत आहेत.त्यामुळे कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या बारा दिवसात कोरोनाने 227 जणांचा बळी गेला आहे. तर आज अखेर 624 जणांचा बळी कोरोनाने गेला आहे. कोरोनामुळे वृद्ध, जुने आजार असलेले नागरिक मृत्यू पावत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. कोरोनाचा वाढत चाललेला आकडा पाहून राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ.साधना तायडे यांनी साताऱ्यात येऊन आढावा घेतला. दरम्यान, शनिवारी 25 जणांचा बळी झाला आहे तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात रेकॉर्ड ब्रेक 1086 बाधीत आले आहेत.
12 दिवसात 210 जणांचा बळी
कोरोनाच्या जिल्ह्यात पीकअवर सुरू आहे. रुग्णांची संख्या आठशे ते पावणे नऊशेच्या पटीत आढळून येऊ लागले आहेत. किरकोळ सर्दी, ताप, कणकणी ही लक्षणे अंगावर काढण्याऱ्यांना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह अहवाल येतो, अशा अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. पॉझिटिव्ह झालेल्याना उपचारासाठी रुग्णालयाने हाऊसफुल आहेत तर घरी उपचार करायचे म्हणले तरी सरकारी यंत्रणेचे नियम कडक आहेत. त्यामुळे खाजगी डॉक्टर येण्याचे टाळतात. कोरोनाचा महाउद्रेक सुरू आहे. जिल्ह्यात आज 54 हजार 790 जणांचे तपासणी केली आहे. त्यातील 23 हजारांचा टप्पा बाधित रात्रीच्या आलेल्या आकड्यात गाठला आहे. गेल्या 12 दिवसात तब्बल 210 बळी वाढले आहेत. मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचीच चिंता आरोग्य विभागासह प्रशासनाला लागली आहे.
आरोग्य संचालिकांनी काय दिला कानमंत्र
सातारा जिल्ह्याचा वाढत चाललेला कोरोनाचा आकडा चिंताजनक आहे. राज्यात सातारा जिल्ह्याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दररोज हजार समीप रुग्ण बाधित आढळून येऊ लागल्याने शनिवारी राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ.साधना तायडे या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या. सकाळपासून क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत होत्या. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांच्याकडून माहिती घेतली. कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी काय करता येईल, बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी काय करता येईल, नागरिकांच्या मनात असलेली भीती कशी घालवता येईल याबाबतचा नेमका काय कानमंत्र दिला ते समजू शकले नाही.त्यांनी जिल्ह्यातील जम्बो हॉस्पिटलच्या तयारीचा आढावा घेतल्याचे समजते.
25 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे सातारा तालुक्यातील शाहुनगर येथील 45 वर्षीय पुरुष, पाडळी येथील 64 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 36 वषी्रय पुरुष, सोनवडी पो. गातवडे येथील 72 वर्षीय पुरुष, विासवा नाका येथील 78 वर्षीय पुरुष, सातारा येथील 65 वर्षीय महिला, कोंडवे येथील 77 वषी्रय पुरुष, अंगापूर येथील 85 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये शागनगर सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथील 58 वषी्रय पुरुष, लाखा नगर वाई येथील 70 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 68 वर्षीय महिला, अंबेरी ता. वाई येथील 40 वर्षीय पुरुष, तोंडोली ता. कडेगाव येथील 70 वर्षीय महिला, वरुड ता. खटाव येथील 72 वषी्रय पुरुष, तर सी. सी. सी. पुसेगाव येथील 1 पुरुष, पारले ता. कराड येथील 2 महिला व 3 पुरुष, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 1 महिला व 3 पुरुष असे एकूण 25 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
सातारा कोव्हिड डिफेडर ग्रुप धावतोय माणुसकीसाठी
कोरोना बाधित रुग्ण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोणत्याही रुग्णालयात वाटेल ते करून जवळचे किडुक मिडुक विकून धडपडत आहे. मात्र, सध्याच वातावरण माणूस माणसाला विसरत चालला आहे. पैसा महत्वाचा नसून येथे माणूसकी महत्वाची आहे. आणि हीच माणूसकी सातारा येथील कोव्हिडं डिफेडर ग्रुपच्यावतीने जपण्याचे कार्य केले जात आहे. याच गृपचे प्रशांत मोदी यांना एक कोरोना बाधित रुग्ण असह्य वेदनेने तडफडत बेड मिळवण्यासाठी धडपडत असल्याचे समजले. दुपारी दोन वाजल्यापासून तो रुग्ण खाजगी आणि क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात बेड मिळतो का हे पहात होते पण निराशा. प्रशांत मोदी यांनी त्या रुग्णासाठी बेड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि रात्री 2 वाजता एका खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देण्यात यश आले. रुग्णावर उपचार सुरू झाले. सातारा कोव्हिडं डिफेनडर या गृपची माणूसकी या संकट काळात दिसून आली.
पाटणला होणार वस्तिगृहात ऑक्सीजनसह २५ बेडचे सोय
पाटण तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कराड व सातारा येथे रुग्णांना पाठविणे गैरसोईचे होत असल्यामुळे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात ज्याप्रमाणे आपण ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु केले आहे त्याचप्रमाणे पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहामध्ये आपण लोरिस्कमधील कोरोना बाधित रुग्णांना दाखल करुन घेत आहोत त्याठिकाणी ऑक्सीजनसह २५ बेडचे काम तात्काळ सुरु करा. त्याठिकाणी लागणारे २५ बेड दोनच दिवसात उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले आहे. लागणारे २५ ऑक्सीजन सिलेंडर हे स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टमार्फत बुधवारपर्यत उपलब्ध करुन दिले जातील त्यामुळे या कामांस लवकर सुरुवात करा आणि येत्या बुधवारपर्यंत काम पुर्ण करा अशा सुचना आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तालुका प्रशासनाच्या कोवीड संदर्भातील सर्व अधिकाऱ्यांना केल्या.
पोलीस यंत्रणेने दक्ष रहाण्याची दिल्या गृहराज्यमंत्री देसाई यांनी सूचना
कोरोनाच्या संकटामुळे गत सहा महिन्यापासून सुरु असलेले राज्यामधील लॉकडाऊन बहूतांशी प्रमाणात उठल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे.मोठमोठया शहरात लॉकडाऊन उठल्यामुळे गर्दी वाढू लागली असून आता लॉकडाऊन नाही तर आपल्याला कोण विचारणार? अशी भावना जनमानसात निर्माण झाली असून कोरोनाचा समुहसंसर्ग होऊ नये याकरीता पोलीस यंत्रणेलाच दक्ष आणि सतर्क रहावे लागणार असल्याने त्याप्रमाणे आपले विभागाचे नियोजन करावे अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक व त्यांच्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर, सोलापुर, पुणे, सांगली, सातारा येथील पोलिस अधीक्षकांना केल्या व पोलीस विभागातील अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यामुळे दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हातील हॉस्पिटल मधील कृत्रिम प्राण वायुचा पुरवठा खंडित होणार नाही जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणावर कृत्रिम प्राण वायु पुरवठा करावा लागत आहे. त्यात कोणताही खंड पढू दिला जाणार नाही असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे. सध्या समाज माध्यमातून सातारा जिल्ह्याला कृत्रिम प्राण वायुचा पुरवठा बंद केला जाईल असे एका पत्राचा हवाला देऊन बातम्या दिल्या जात आहेत. ती प्रशासकीय तांत्रिक बाब असून त्यातून प्रशासनाने मार्ग काढला असून पूर्वी सारखाच पुरवठा सुरु राहिल असे जिल्हाधिकाऱ्यानी सांगितले आहे, त्यामुळे चिंता करू नये. जनते मध्ये संभ्रम निर्माण होईल असे वृत्त पसरवू नये असे आवाहन ही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
630 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 1124 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 630 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 1124 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
1124 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 66,उपजिल्हा रुग्णालय कराड 22, उपजिल्हा रुग्णालय फलटण 74, कोरेगाव 131, वाई 153, खंडाळा 55, रायगांव 88, पानमळेवाडी 47, मायणी 162, महाबळेश्वर 50, पाटण 12, दहिवडी 38, खावली 35, तळमावले 33 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 158 असे एकूण 1124जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
शनिवार पर्यंत जिल्हय़ात घेतलेले एकूण नमुने –55914, ,एकूण बाधित — 23949, घरी सोडण्यात आलेले — 14567, मृत्यू — 624, उपचारार्थ रुग्ण –8758
शनिवारी जिल्ह्यात एकूण बाधीत 1086, एकूण मृत्यू 25, एकूण मुक्त 630







