दिल्ली – केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची प्रकृती शनिवारी रात्री बिघडल्यामुळे त्यांना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील एम्स् रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित शाह यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता.
कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शाह यांना 2 ऑगस्ट रोजी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील महिन्यात म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी ते कोरोनामुक्त झाले होते. अमित शाह यांनी स्वत:च ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली होती.
आपल्या ट्वीटमध्ये अमित शाह म्हणाले, “आज माझ्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार. हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने जे केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो.” यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.







