धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : २ लाख ६३ हजार ५२० रुपयांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त

crime
File Photo

धुळे (प्रतिनिधी) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने बेकायदेशीररित्या मद्यसाठ्याची वाहतूक करणार्‍या पिकअप वाहनातून २ लाख ६३ हजार ५२० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.४) धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर चाळीसगाव चौफुलीवर केली.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना महेंद्रा पिकअप वाहन (क्रमांक एम.एच.०४ जीएफ ९६७९) मधून मद्याची शिरपूरकडून चाळीसगाव चौफुलीमार्गे चाळीसगावकडे वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी पथकाला निर्देश दिले.

 

पथकाने सहा वाजेच्या सुमारास चाळीसगाव चौफुलीवर सापळा रचल्यानंतर संशयीत वाहन येताच झडती घेतली असता त्यात मद्यसाठा आढळल्याने, वाहनासह चालक हकीम याकुब पटेल (वय ३३, रा.प्लॉट नं.२५१/२, एम.आय.डी.सी. सेक्टर, जळगाव, काट्या जवळ, साईनगर, जळगाव) यास ताब्यात घेतले. चार लाख रुपये किंमतीचे वाहन व २ लाख ६३ हजार ५२० रुपयांचा मद्यसाठा असे मिळून ६ लाख ६३ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here