धक्कादायक ऑनलाईन क्लास सुरू असताना शिक्षकाने ४ मुलींना पाठवले अश्लील स्टिकर्स

संग्रहित फोटो

मुंबई (हितेश मिस्त्री) – गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासल्याचे काम मुंबईतील एका शिक्षकाने केले आहे. मुंबईत एका ३२ वर्षीय शिक्षकाने चार विद्यार्थिनींना अश्लील स्टिकर्स पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४८ तासांतच आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार १० वर्षीय पीडित विद्यार्थिनीने शिक्षकाच्या विरोधात पोलिसंत तक्रार दाखल केली होती. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाइल फोनही जप्त केला आहे. आरोपी शिक्षक हा गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत शिकवत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ६ आणि ७ सप्टेंबर रोजी ऑनलाईन क्लासेस दरम्यान घडली आहे. आरोपी शिक्षकाने रविवारी तीन स्टिकर्स विद्यार्थिनीला पाठवले होते. पण त्यानंतर लगेचच त्याने ते डिलिट केले. मग सोमवारी पुन्हा एकदा या शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील स्टिकर्स पाठवले. पीडित विद्यार्थिनीने हे स्टिकर्स आपल्या आई-वडिलांना दाखवले आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी १० वर्षीय मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एफआयआर दाखल केल्यावर आम्ही आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांना विविध ई-संवादाच्या माध्यमांद्वारे शिक्षण सुरू आहे. यासाठी दूरदर्शन, आकाशवाणी, यु-ट्यूब सारखी माध्यमे वापरली जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता शाळा सुरू करणे शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे त्यांचे शैक्षणिक वर्ष सुद्धा वाया जाता कामा नये, यासाठी ऑनलाईन शिक्षणाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आता मुंबईत ऑनलाईन क्लास सुरू असताना घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here