सायन हॉस्पिटलमध्ये मृतदेहाच्या अदलाबदलीवरुन राडा

मुंबई (हितेश मिस्त्री) – सायन हॉस्पिटलमध्ये मृतदेहाच्या अदलाबदलीवरुन वाद झाला. या निमित्ताने नाराज नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर सडकून टीका केली. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आतापर्यंत १ लाख ६९ हजार ७४१ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी ३० हजार ३१६ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना झालेल्यांपैकी १ लाख ३० हजार ९१८ जण बरे झाले तर ८ हजार १५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना झालेल्यांपैकी काही जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाला. कोरोना संकट वाढत असताना मुंबईत सामान्य नागरिकांना त्यांच्या घरातील मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यदर्शनाची इच्छा पूर्ण करणेही कठीण झाले आहे.
अंकुश सुरवाडे हा २७ वर्षांचा व्यवसायाने डान्सर असलेला तरुण इस्टर्न फ्री वे येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्याचा मृत्यू झाला. हॉस्पिटल प्रशासनाने त्याच्या मृतदेहाचा ताबा भलत्याच कुटुंबाला दिला. कोरोना संकट असल्यामुळे मुंबईत कोविड प्रोटोकॉल लागू आहे. या प्रोटोकॉलनुसार मृतदेह एका प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवून बंदीस्त स्वरुपात दिला जातो. या अपारदर्शक प्लॅस्टिक बॅगला उघडण्यास प्रोटोकॉलद्वारे मनाई करण्यात आली आहे. यामुळे मृतदेह न बघताच ताब्यात घेऊन संबंधित कुटुंबाने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र अंकुशचे नातलग मृतदेहाचा ताबा घेण्यासाठी गेले त्यावेळी त्यांना बराच वेळ मृतदेहाचा ताबा देण्यात आला नव्हता. नातलगांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यावर त्यांना मृतदेह भलत्याच कुटुंबाला देण्यात आल्याचे समजले. तसेच अंकुशवर अंत्यसंस्कार झाले असल्याचे कळले. हा प्रकार लक्षात येताच अंकुश सुरवाडेच्या नातलगांनी हॉस्पिटल प्रशासनाशी वाद घातला. तसेच पोलीस ठाण्यात जाऊन हॉस्पिटल प्रशासनाविरोधात हलगर्जीपणा केल्याची तक्रार नोंदवली. अंकुश प्रकरणात नातलगांनी हॉस्पिटल प्रशासनावर किडणी काढून घेतल्याचा आरोप केला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने हा आरोप सपशेल नाकारला आहे. मृतदेहाची अदलाबदल झाली असे हॉस्पिटल प्रशासनाने मान्य केले, मात्र किडनी काढून घेतल्याचा आरोप फेटाळला. यावरुन अंकुशचे नातलग, त्यांना समर्थन देणारे वडाळ्यातील नागरिक आणि हॉस्पिटल प्रशासन यांच्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत वाद झाला. अंकुशचा मृतदेह खरच दुसऱ्या कुटुंबाला सोपवला की किडनी काढून घेतल्याचे समजू नये म्हणून परस्पर हॉस्पिटल प्रशासनाने अंत्यसंस्कार केले आणि दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे, असाही आरोप अंकुश सुरवाडेच्या नातलगांनी सायन हॉस्पिटलच्या प्रशासनावर केला.
कोरोना संकटाच्या वाढत्या तीव्रतेमुळे मुंबईतील पालिकेच्या हॉस्पिटलांवर अवास्तव ताण निर्माण झाला आहे. हॉस्पिटलमध्ये मृतदेहांची अदलाबदल होणे, जीवंत व्यक्ती मृत जाहीर करुन भलत्याच व्यक्तीचा मृतदेह संबंधिताच्या कुटुंबाला सोपवणे, अंत्यसंस्कार झाल्यावर सर्व प्रकार उघड होणे अशा घटना अधूनमधून घडत आहे. मृतांच्या अवयवांची चोरी होण्याचे आरोपही होत आहेत. या प्रकरणात मुंबई पोलीस तपासाचे आश्वासन देत असले तरी मुंबईत अवयवांचा व्यवसाय अथवा तस्करी केल्याप्रकरणी अद्याप मोठी कारवाई झालेली नाही.
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना संकटाची तीव्रता वाढत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १० लाख ६० हजार ३०८ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी २ लाख ९० हजार ३४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना झालेल्यांपैकी ७ लाख ४० हजार ६१ जण बरे झाले तर २९ हजार ५३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. काही जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाला. हॉस्पिटलांच्या पातळीवर अशा अक्षम्य चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाय करा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here