मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील हजारो ज्युनिअर आर्टिस्ट (कलावंत) कामगार गेल्या तब्बल १२ वर्षांपासून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. वाढती महागाई, अस्थिर रोजगार आणि अत्यल्प मानधन यामुळे या कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर प्रश्नाबाबत ‘इन्टरनॅशनल ह्युमन राइट्स असोसिएशन’च्या (महिला सेल, इंडिया) अध्यक्षा तथा ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशन (ऑल इंडिया)च्या चेअरमन नजमा अस्लम सय्यद यांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेपाची आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
या निवेदनात अनेक उत्पादक (Producers) आणि पुरवठादारांनी (Suppliers) गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या मानधनात कोणतीही वाढ केलेली नाही, ज्यामुळे हजारो कुटुंबांचे जीवन गंभीर संकटात सापडले आहे. आर्थिक व मानसिक तणावामुळे अनेक कामगार नैराश्यात गेले आहेत. २०२१ मध्ये ज्युनियर आर्टिस्ट राजू साप्ते यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतरही काही ज्युनियर कामगारांनी आत्महत्या केल्याच्या घटना अत्यंत गंभीर असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे.
यापूर्वी अनेकदा ई-मेल व निवेदनांद्वारे पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा भेटीची वेळ मिळालेली नाही. त्यामुळे ज्युनियर आर्टिस्टच्या प्रतिनिधींना तातडीने भेट देऊन सर्व पुरावे आणि समस्या प्रत्यक्ष सादर करण्याची संधी देण्यात यावी. संबंधित उत्पादक आणि पुरवठादार यांनी मानधन न वाढवल्याबाबद्दल वस्तुस्थितीची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
“आम्ही कोणतीही विशेष सवलत मागत नाही, तर भारतीय संविधानाने दिलेला समानतेचा, सन्मानाने जगण्याचा आणि न्याय मिळवण्याचा अधिकार मागत आहोत,” अशी आर्त हाक या निवेदनातून देण्यात आली आहे. शासनाने या गंभीर आणि मानवीय प्रश्नाची संवेदनशीलता ओळखून हजारो गरीब ज्युनिअर आर्टिस्ट कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी आक्रमक भूमिका संघटनेने घेतली आहे.







