जळगाव (जिल्हा क्राईम रिपोर्टर प्रमोद रुले) | जिल्ह्यातील पाळधी-तरसोद बायपास मार्गावर मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याची अत्यंत गंभीर घटना घडली आहे. या घटनेची तातडीने दखल घेत आज प्रमुख शासकीय यंत्रणा व मंत्र्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्राथमिक निरीक्षणातच रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित करण्यात आली असून, यापूर्वीही या प्रकल्पाबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याचे कठोर आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
रस्त्याच्या खचलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आणि तातडीने उपाययोजना राबवण्यासाठी झालेल्या या पाहणी दौऱ्यात श्री. गिरीश महाजन (जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री), श्री. गुलाबराव पाटील (पालकमंत्री, जळगाव जिल्हा), श्री. सुरेश भोळे (आमदार), श्री. रोहन घुगे (जिल्हाधिकारी), सौ. दीपमाला काळे (महापौर) तसेच लालचंद पाटील व पिंटू पाटील यांच्यासह विविध विभागांचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पावसामुळे रस्त्यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान आणि त्यामागील निकृष्ट बांधकामाच्या मुद्यावरून प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, चौकशी अहवालानंतर दोषी ठेकेदार व संबंधितांवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







