राष्ट्रीय किसान मोर्चाने दिले धरणगाव तहसिलला निवेदन
धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – ५ जून २०२० रोजी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जे ३ अध्यादेश पारित केले आहेत ते परत घ्या अशी मागणी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या तिसऱ्या शृंखलेतील देशव्यापी आंदोलनाद्वारे देशभरातील तहसिल कार्यालयांना निवेदन देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किसान मोर्चा धरणगाव च्या वतीने देखील तहसिल कार्यालय धरणगाव येथे निवेदन देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की , लॉक डाऊनच्या कालावधीत केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले. यामध्ये प्रामुख्याने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ज्या कृषी व्यवसायाकडे पाहिले जाते त्या शेती आणि शेतकऱ्यांच्या विरोधात ३ अध्यादेश पास केलेत. आज देशाचा जीडीपी – २३.९ एवढा झाला असून सर्व क्षेत्रात देश ऋण स्तरावर आहे फक्त आणि फक्त कृषी क्षेत्रात देश धन स्तरावर आहे. या लॉक डाऊनच्या काळात जे शेतकरी विरोधी निर्णय घेण्यात आले त्यामध्ये 1) The Farmers ( empowerment & protection ) agreement on price assurance and farm services ordinance, 2) Farmers produce trade and commerce promotion and financial, 3) The essential commodities ( amendment ) act 1955 हे तिनही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून पुंजीपती व व्यापाऱ्यांच्या जास्त हिताचे आहेत. या कायद्यांमुळे संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जर सरकारने हे अध्यादेश रद्द केले नाहीत तर सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल , अशी भावना निवेदनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. राष्ट्रीय किसान मोर्चाकडून नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भारत मुक्ती मोर्चा , बहुजन क्रांती मोर्चा , छत्रपती क्रांती सेना , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा , बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क या सहयोगी संघटनांनी पाठिंबा दिला.
याप्रसंगी राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब चौधरी , भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे , बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका कार्याध्यक्ष सिराज कुरेशी – धरणगाव शहराध्यक्ष नगर मोमीन , बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे निलेश पवार , सामाजिक कार्यकर्ते विकास लांबोळे , भारत मुक्ती मोर्चाचे तालुका प्रभारी गौतम गजरे , मयूर भामरे , किरण सोनवणे , विनोद बिजबीरे , अमोल कोळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







