पनवेल उपजिल्हा रूग्णालयात व्हेंटिलेटर वाढविण्याचे निर्देश

  • कांतीलाल कडू यांच्या मागणीला पालकमंत्र्यांचा ‘हिरवा कंदिल’
  • खासगी हॉस्पीटलला लागेल तेवढा ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी
  • निवासी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित

पनवेल/अलिबाग-सोगावकर (प्रतिनिधी) –  कोविड रूग्णांना दिवसेंदिवस ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची भासणारी कमतरता दूर करण्यासाठी पनवेल उपजिल्हा रूग्णालयात आणखी दहा व्हेंटिलेटर वाढविण्याचे निर्देश तसेच खासगी हॉस्पीटलला लागणारा ऑक्सिजन पुरवठा देण्यासोबत आणखी काही हॉस्पीटलला कोविड दर्जाची परवानगी देण्याचे आदेश रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी आज दिले.
पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांनी आज दुपारी 2 वाजता संबंधितांची तातडीने ऑनलाईन बैठक बोलाविली होती. त्यावेळी त्यांनी हे निर्देश महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिले.
बैठकीत पालकमंत्री आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, निवासी जिल्हाधिकारी पद्मीनी बैनाडे, महापालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख, उपायुक्त संजय शिंदे, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, डॉ. गिरीश गुणे आणि सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू सहभागी झाले होते.
पीएम केअर फंडातून आलेल्या वीस व्हेंटिलेटरपैंकी दहा व्हेंटिलेटर डी. वाय. पाटील रूग्णालयात पाठविले आहेत. उर्वरित 10 व्हेंटिलेटर उपजिल्हा रूग्णालयात बसवण्यात यावेत, अशी कांतीलाल कडू यांची मागणी होती. बैठकीची सुरूवातच त्यांनी या मुद्द्याने केली. त्यावर पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी तातडीने हे व्हेंटिलेटर इथेच सुरू करण्यात यावेत. त्यासाठी लागणारा निधी तसूभ़रही कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तर वैद्यकीय अधिकार्‍यांचा ऐरणीवर आलेला मुद्दा सुद्धा सोडविण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.
खासगी डॉक्टर पुरेसा पगार देवून किंवा जाहिराती देवूनही संपर्क साधत नसल्याची खंत महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली. डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने आयसीयू चालविणे अवघड असल्याची कैफियत त्यांनी मांडली. शिवाय खासगी डॉक्टरांना कारणे दाखवा नोटिस बजावली म्हणून स्वास्थ हॉस्पीटलने न्यायालयात महापालिकेला खेचले आहे. दरमहा 5 कोटी रूपये नुकसान भरपाई मागितली असल्याची माहिती त्यांनी पालकमंत्र्यांना दिली.
आयसीयूत काम करण्यासाठी खासगी डॉक्टरांना सरकारच्या नियमानुसार पगार देतो. जास्त पगार देणे अवघड असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. त्याशिवाय अलिबागमध्ये फार अल्पप्रमाणात खासगी डॉक्टर सहकार्य करीत आहेत. मग पनवेलला का मदत करू शकत नाहीत, असा प्रश्‍न त्यांनी बैठकीत उपस्थित केला.
त्यावर पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी शहरांच्या दृष्टीने विचार करता अलिबाग किंवा पनवेल अशी तुलना करणे उचित ठरणार नाही, असे सांगून पनवेलच्या शेजारी नवी मुंबई, मुंंबई आणि ठाणे अशी बलाढ्य शहरे असल्याने पनवेलच्या डॉक्टरांचीही पगाराची अपेक्षा जास्त असू शकते, असा युक्तीवाद करून त्यांनी वैद्यकीय क्षेत्राचे वास्तव विशद केले.
कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पनवेलमध्ये आयसीयूत आणखी दहा व्हेंटिलेटर वाढवून घ्यायचे आहेत. त्याशिवाय दूरदृष्टीने कोरोनाचा मुकाबला करताना आणखी काही खासगी हॉस्पीटलशी संपर्क साधून अथवा त्यांचे प्रस्ताव आल्यास तातडीने त्यांना कोविड रूग्णांसाठी परवानगी देण्यात यावी, असे आदेश ना. तटकरे यांनी देशमुख यांना दिले. त्याशिवाय दोन दिवसात बैठक बोलावून यावर मार्ग काढण्याचेही सुचित केले.
खासगी डॉक्टरांच्या पगारासहित काही महत्वाच्या मुद्द्यांवर डॉ. गिरीश गुणे यांनी सखोल चर्चा घडवून आणली. त्यांनी उपजिल्हा रूग्णालयाची टीम, डॉ. येमपल्ले यांचे खास अभिनंदन करून कोविड रूग्णांना मिळणार्‍या वैद्यकीय सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.
खासगी हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होत असल्याने तातडीने त्यांना सरकारी दरात ते उपलब्ध व्हावे. ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याचा थेट परिणाम रूग्णांवर होतो. तो विषय अतिशय गंभीर असल्याचे कडू यांनी पटवून दिले.
त्यावर बोलताना, जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले आहे की, निवासी जिल्हाधिकारी पद्मनी बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यांना खासगी डॉक्टरांनी संपर्क साधावा. ऑक्सिजनची अजिबात कमतरता भासणार नाही.
रायगडात महाड, पोलादपूर आणि पेणमध्येच ऑक्सिजन तयार करणारे कारखाने असून छत्तीसगडलासुद्धा आपण ऑक्सिजन पुरवत आहोत. मग रायगडला कमी कसे पडू देणार, असेही त्या म्हणाल्या.
रायगड आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला काम करायचे असून आपणच त्यांना ऑक्सिजन पुरवू या, असे मत ना. तटकरे यांनी मांडले.
त्यामुळे कांतीलाल कडू यांच्या दुसर्‍या मागणीलाही पूर्ण न्याय मिळाला असून आता पनवेलसह रायगडात ऑक्सिजनचा समतोल पुरवठा होणार आहे. त्यामुळे खासगी हॉस्पीटल आणि कोविड रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कडू यांनी बैठकी गाजवताना उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांची कमतरता, डॉ. पोवार यांच्यावर पडणारा ताण, त्यांनी दोन वेळा आजारी पडल्यानंतरही 120 खाटांच्या हॉस्पीटलची कोविड रूग्णांची जबाबदारी डॉ. नागनाथ येमपल्ले यांच्या सहकार्याने पेळली, त्याबद्दल त्यांच्यासह अन्य सहा डॉक्टर, ज्यापैंकी मधुमेह आणि पन्नासी ओलांडल्यानंतरही सर्व धोके पत्करून सेवा बजावत आहेत. त्यांचे अभिनंदन केले.
मुंबई बायो वेस्टमुळे खासगी डॉक्टरांना बसणारा फटका आणि त्यातून रूग्णांच्या देयकामध्ये होणारी आपसूक वाढ याबाबतही कडू यांनी मुद्दा लावून धरला. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी अतिशय सकारात्मकतेने सर्व मुद्यांना स्पर्श करून ते सोडविण्याचे आदेश आयुक्त देशमुख यांना दिले आहेत. त्यामुळे समस्त पनवेलकरांना भेडसावणार्‍या ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, खासगी डॉक्टर, कोविड हॉस्पीटल याबाबत प्रश्‍न मार्गी लागतील, असे स्पष्ट झाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here