वोडाफोन-आयडिया कंपनीविरुद्ध रायगड ग्राहक मंचात ३२ लाखांचा दावा

वोडाफोन-आयडिया

अलिबाग (संपादक सुनिल पाटील) रिचार्जचे पैसे बँक खात्यातून वळते होऊनही मोबाईल सेवा खंडित केल्याप्रकारणी ‘वोडाफोन-आयडिया’ कंपनीविरुद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग (रायगड-अलिबाग) येथे तब्बल ३२ लाख रुपयांचा नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यात आला आहे. अलिबागचे प्रसिद्ध वकील ॲड. अजय उपाध्ये यांच्यामार्फत ज्येष्ठ पत्रकार आणि रायगड भूषण प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी ११ मे २०२६ रोजी हा दावा दाखल केला असून, या प्रकरणाकडे आता संपूर्ण रायगडकरांचे लक्ष लागले आहे.

तक्रारदार प्रा. डॉ. जयपाल परशुराम पाटील हे अलिबागचे कायम रहिवासी असून, गेल्या ४० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. संपादक, उपसंपादक आणि वार्ताहार म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. यासोबतच ते देशभरात आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणूनही सक्रिय आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण’, ‘गुणवंत कामगार’ आणि ‘आदिवासी सेवक’ पुरस्काराने सन्मानित केले आहे, तर त्यांना ‘रायगड भूषण’ हा किताबही बहाल करण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक कार्यासाठी डॉ. पाटील हे वोडाफोन कंपनीचा ९६७३७२७२७७ हा लोकप्रिय क्रमांक वापरत होते. हा क्रमांक महाराष्ट्र पोलीस, वकील, डॉक्टर, परिचारिका, रुग्णवाहिका चालक आणि सामान्य नागरिकांच्या तोंडपाठ होता.

दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. पाटील यांनी गुगल पे (Google Pay) द्वारे ४८९.३० रुपयांचे रिचार्ज केले होते. खात्यात पुरेशा बॅलन्स असतानाही वोडाफोन कंपनीने अचानक त्यांची सेवा बंद केली. मोबाईल सेवा ठप्प झाल्यामुळे डॉक्टर, वकील, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस आणि नगरसेवक यांसारख्या महत्त्वाच्या घटकांशी त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला.

ते ‘अखिल भारतीय ज्येष्ठ पत्रकार संघाचे’ राष्ट्रीय सचिव असल्याने देशभरातील संपर्क यंत्रणा विस्कळीत झाली. परिणामी, त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या १५ ते २० महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता आले नाही. यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.

कंपनीला रीतसर पैसे देऊनही दर्जेदार सेवा न मिळाल्याने आणि सेवा त्रुटी ठेवून फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. पाटील यांनी कायदेशीर नोटीस बजावली होती. मात्र, कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी ग्राहक मंचाचे दरवाजे ठोठावले आहेत. शारीरिक, आर्थिक आणि मानसिक नुकसानापोटी ३२ लाख रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी या दाव्यात करण्यात आली आहे. तसेच, दाव्याचा खर्च म्हणून २५,००० रुपये कंपनीने द्यावेत, अशी मागणी ॲड. अजय उपाध्ये यांनी केली आहे. या खटल्याची पहिली सुनावणी २२ मे २०२६ रोजी होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here