आराधना फाईन आर्ट्स व बालरंगभूमी परिषदेतर्फे गरजू पाल्यांसाठी विनामूल्य नियमित ‘कथक’ प्रशिक्षण वर्ग

बालरंगभूमी

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । कलेच्या क्षेत्रात गेली २९ वर्षे अविरत कार्य करणाऱ्या डोंबिवलीतील ‘आराधना फाईन आर्ट्स’ अकादमी आणि ‘बालरंगभूमी परिषद’ जळगाव जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संस्थेच्या संचालिका स्मिता बागूल मोरे यांच्या मातोश्री स्व. शालिनी वसंत बागुल यांच्या स्मरणार्थ, अत्यंत कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या इयत्ता तिसरी ते दहावीच्या पाल्यांसाठी विनामूल्य ‘कथक’ नृत्याचे ऑनलाईन व ऑफलाईन धडे दिले जाणार आहेत.

‘आराधना फाईन आर्ट्स’ ही संस्था गेल्या २९ वर्षापासून कार्यरत असून, या संस्थेमार्फत घडलेले अनेक विद्यार्थी–विद्यार्थिंनी या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त आहेत. संस्थेच्या संचालिका स्मिता बागुल-मोरे यांनी कथक नृत्यात उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांनी सुरुवातीला जळगाव येथील प्रसिद्ध कथक गुरू यादवेंद्र लाभांते यांच्याकडून नृत्याचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर दिल्लीतील प्रतिष्ठित ‘कथक केंद्र’ येथून या कलेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या या कलेचा फायदा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने आराधना फाईन आर्ट्स व बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेने या विनामूल्य नृत्य वर्गाचे संयुक्त नियोजन केले आहे. हा नृत्यवर्ग नियमित ५ वर्षाचा असून, आठवड्यातून दोन दिवस घेण्यात येणार आहे.

 

विद्यार्थ्यांना होणार शैक्षणिक फायदा

शास्त्रीय नृत्यामुळे केवळ कलेची जोपासना होत नाही, तर त्याचा शैक्षणिक फायदाही विद्यार्थ्यांना मिळतो. सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या किंवा शासनाने मान्यता दिलेल्या स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्ड परीक्षेत वाढीव ५ टक्क्यांचा सवलत लाभ मिळू शकतो. त्यामुळे या विनामूल्य प्रशिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही होणार आहे.

या वर्गात पालकांचे अत्यल्प उत्पन्न असणारे इयत्ता ३ री ते १० वी मधील विद्यार्थी–विद्यार्थिंनी प्रवेश घेऊ शकतात. सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थी – विद्यार्थिंनींना पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. ही नृत्य कार्यशाळा जून २०२६ पासून ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही स्वरुपात होणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गरजू विद्यार्थी व पालकांनी अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी ‘आराधना फाईन आर्ट्स’ अकादमी व बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा  यांच्याशी 99606 55021  व 9657701792 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here