मुंबई (क्राइम रिपोर्टर) – मानखुर्द येथील पीएमजीपी न्यू म्हाडा कॉलनीमध्ये असलेल्या कोविड सेंटरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तेथील कंत्राटी कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दीपेश सूर्यकांत साळवी (२०, रा. देवनार, मानखुर्द) या आरोपीला मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे.
सोमवार (दि. १४) पहाटे तीनच्या दरम्यान कोविड सेंटरच्या १३ व्या मजल्यावर महिला विभागात हा आरोपी सॅनिटाईज करण्याच्या बहाण्याने गेला. यावेळी तिथे झोपलेल्या पीडित कोरोना पोझिटिव्ह मुलीवर त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने आरडाओरडा केला असता या आरोपीने तिला मारहाण देखील केली. यावेळी तिथले इतर लोक जागे झाले आणि त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
मानखुर्द पोलिसांनी या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. मात्र, यामुळे कोरोना सेंटरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना सेंटर महिलांसाठी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.







