कोरोनाग्रस्त पोलिसांच्या मृत्यूचे सत्र सुरुच; २४ तासात दोन अधिकाऱ्यांसह सहा अंमलदारांचा मृत्यू

मुंबई (हितेश मिस्त्री) – स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनासंबंधी कर्तव्य बजावत असलेल्या राज्य पोलीस दलातील पोलिसांच्या मृत्यूचे सत्रच सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबई आणि रत्नागिरी पोलीस दलातील दोन अधिकार्‍यांसह 6 अंमलदारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा 202 वर पोहोचला आहे. तर, गेल्या चोवीस तासांत 371 पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस प्रशासनाची चिंता आनखीनच वाढली आहे.
गेल्या चोवीस तासांत दोन अधिकार्‍यांसह सहा अंमलदारांच्या मृत्यूने पोलीस दल पुन्हा एकदा हादरले. मुंबई आणि रत्नागिरी पोलीस दलातील दोन अधिकारी, तर ठाणे शहर, नाशिक शहर, सांगली, जळगाव, नंदुरबार आणि उस्मानाबाद पोलीस दलातील सहा अंमलदार अशा एकूण आठ जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. त्यामुळे पोलीस मृतांची संख्या 202 झाली असून यात 20 अधिकारी आणि 182 अंमलदारांचा समावेश आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असून गेल्या चोवीस तासांत राज्यात आणखी 371 पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा 19 हजार 756 वर पोहोचला आहे. यात 2 हजार 142 अधिकारी आणि 17 हजार 614 अंमलदारांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here