पुणे (उपसंपादक मनीष नेरुरकर) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि विक्रम भावे यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी पुन्हा फेटाळून लावला. या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून डॉ. तावडे याने तिसर्यांदा तर भावे याने दुसर्यांदा अर्ज केला होता.
सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी युक्तीवाद करताना सांगितले होते की, संशयीत भावेचा जामीन अर्ज आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर फेटाळण्यात आला आहे. त्याला जर अर्ज करायचा असेल तर त्याने तो उच्च न्यायालयात करावा. त्याला एका बॉम्बस्फोट प्रकरणात दहा वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावल्यानंतर पाच वर्ष शिक्षा भोगून तो जामीनावर बाहेर होता. त्यानंतर त्याने पुन्हा गुन्हा केला. त्याच्या विरूध्द रेकी केल्यासंबंधीचे तसेच इतर देखील पुरावे आहेत.
डॉ. तावडे याचे दोन जामीन अर्ज यापूर्वी फेटाळण्यात आले आहे. त्याला यासाठी उच्च न्यायालयात जाणे गरजेचे आहे. त्याला या न्यायालयाकडे अर्ज करता येणार नाही. तो कॉ. गोविंद पानसरे यांच्या खूनातील देखील आरोपी असून त्याच्यावर खुनाचे दोन गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला जामीन देण्यात येऊ नये. तसेच गुन्ह्याचा कट त्याने रचला होता. त्यासंबधीचा पुरावा साक्षी पुरावे देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे दोघांचा जामीन फेटाळण्याची मागणी अॅड. सूर्यवंशी यांनी केली.
दरम्यान बचाव पक्षाचे वकीलांनी युक्तीवाद करताना सांगितले होते की, तावडे विरूध्द कोणताही पुरावा नाही. ज्या साक्षीदाराच्या जबावावर तावडे याच्या जामीनाला विरोध होत आहे, तो पुरावा कमकुवत आहे. सत्र न्यायालयात जामीनासाठी एका पेक्षा जास्त जामीन अर्ज करता येतात असेही त्यांचे म्हणणे होते. तसेच दोघांच्या विरूध्द ठोस असे पुरावे नसून त्यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली.
माझे वडील वृद्ध असून सध्या ते आजारी आहेत. त्यामुळे पोलिसांच्या पथकासह मला त्यांना भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज डॉ. तावडेने न्यायालयात केला होता. हा अर्ज मंजूर करत न्यायालयाने पोलिसांच्या उपस्थितीत वडिलांना भेटण्याची परवानगी डॉ. तावडेला दिली आहे. या गुन्ह्यातून वगळण्याबाबत आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर यांनी केलेल्या अर्जावर युक्तिवाद झाला नाही.
सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड आहे, असा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. विक्रम भावे याने कळसकर आणि सचिन अंदुरेसह घटनास्थळाची रेकी केल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोपत्रातून स्पष्ट झाल्याबाबतचा युक्तीवाद यावेळी विशेष सरकारी वकीलांनी करताना जामीन फेटाळण्याची मागणी केली.







