राज्य सरकारच्या दोन विभागातील विसंवादाचा फटका
जळगाव (संपादक सुनिल पाटील) – सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि वित्त विभाग या शासनाच्या दोन विभागात समन्वय नसल्याचा फटका कलाकारांना बसला आहे. राज्य नाटय़ स्पर्धेत सादर झालेल्या नाटकांच्या सादरीकरणाचा खर्च, कलाकारांचा प्रवास भत्ता आणि पारितोषिकाची रक्कम ही दहा महिन्यांनंतरही कलाकारांच्या हाती पडलेली नाही.
गेल्यावर्षी राज्य नाट्य स्पर्धेचे ५९ वे वर्ष होते. सातत्य असलेल्या या स्पर्धेत यावर्षी कोरोनाने खंड पडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र मागील वर्षी झालेल्या स्पर्धेतील खर्च, प्रवासभाडे, भत्ते यासह पारितोषिकप्राप्त संघांना व कलावंतांना पारितोषिकांची रक्कम अद्याप न मिळाल्याने, उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
दरम्यान याबाबत अधिक माहिती घेतली असता, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने पाठपुरावा करूनही वित्त विभागाकडून ठोस कार्यवाही न झाल्यामुळे हा निधी अडकून पडला आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी राज्य नाटय़ स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत मराठी, हिंदी, संस्कृत भाषेतील नाटकांसह संगीत नाटक आणि बालनाटय़ स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांतील कलाकारांना सादरीकरणासह प्रवास आणि भोजन भत्ता दिला जातो. गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्य नाटय़ स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत नाटकांच्या सादरीकरणाचे पैसे सहभागी संस्थांना अद्याप मिळाले नाहीत.
कोणतेही नाटक उभे करताना एका संघाला किमान ५० हजार रुपये ते एक लाख रुपये खर्च येतो. राज्य नाटय़ स्पर्धेत कोणत्याही संघाला एक नाटक सादर करण्यासाठी तीन हजार रुपयांची अनामत भरावी लागते. ही अनामत रक्कम राज्य नाटय़ स्पर्धेच्या आयोजकांनी सर्व संघांना परत केली आहे. मात्र, पारितोषिकांची रक्कम, नाटकाच्या सादरीकरणाचा खर्च, कलाकारांचा प्रवास आणि भोजन भत्ता ही रक्कम अद्याप मिळालेली नाही.
त्यामुळे ही रक्कम तसेच पारितोषिकांची रक्कम व प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्याची राज्य नाट्य स्पर्धेतील स्पर्धक संघ व कलावंतांनी मागणी केली आहे. 







