बारामतीत ४७ लाखांचा गांजा जप्त

बारामती (विशेष प्रतिनिधी) – पाटस-बारामती रस्त्यावर बारामती तालुका पोलिसांनी सुमारे ४७ लाख रुपयांच्या गांजासह १० लाख रुपयांचा टेम्पो असा ५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एका माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ४७ लाख रुपयांचा पकडलेला गांजा ही अलिकडील काळातील बारामतीतील सर्वात मोठी कारवाई आहे. या प्रकरणी चौघांविरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्‍यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय जालिंदर कणसे (वय २, रा. कानरवाडी, ता. कडेगांव जि. सांगली) विशाल मनोहर राठोड (वय १९ रा. नागेवाडी, विटा, ता. खानापूर जि. सांगली),निलेश तानाजी चव्हाण (वय 32, रा. आंधळी, ता. माण, जि. सातारा) व योगेश शिवाजी भगत (वय २२, रा. साबळेवाडी, शिर्सूफळ, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सोमवारी (दि. २०) रात्री पाटस-बारामती रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याबाबत हवालदार भानुदास बंडगर यांनी फिर्याद दाखल केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे यांना याबाबतची खबर मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे, सहाय्यक फौजदार दिलीप सोनवणे, अनिल अमासे, खेडकर, लोखंडे, मखरे, मरळे, काळे, नरुटे, राऊत, मदने, कवितके,जाधव, शेख यांनी ही कारवाई केली.
चार जण गांजा वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना याबाबतची माहिती देण्यात आली. पंच, वजन मापारी यांना सोबत घेत उंडवडी गावच्या हद्दील ड्रायव्हर ढाब्याजवळ गेले. तेथून काही अंतरावर आडोशाला पोलिसांनी दबा धरला. काही वेळानंतर एक तपकिरी रंगाचा आयशर टेम्पो येत असल्याचे पोलिसांनी पाहिले. लंगुटे यांनी लागलीच कर्मचाऱ्यांना सावध केले. पोलिसांनी हा टेम्पो थांबवून झडती घेतली असता त्यात ११ पोती आढळून आली. ही पोती खोलून पाहिली असता त्यात खाकी रंगाच्या प्लास्टिक बॅगांमध्ये हा गांजा भरण्यात आला होता.
पोलिस कारवाईत टेम्पोमध्ये एकूण १३६ बंडल आढळून आले. ते ताब्यात गेत वजन केले असता ३१२.८७४ किलोग्रॅम गांजा आढळला. टेम्पोही ताब्यात घेण्यात आला. जप्त गांजाची किंमत ४६ लाख ९३ हजार रुपये आहे. याशिवाय १० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पोही पोलिसांनी जप्त केला आहे. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांपुढे या घटनेचा पंचनामा करण्यात आला.
पोलिसांनी अटक केलेल्या बारामती तालुक्यातील साबळेवाडी येथील योगेश शिवाजी भगत याच्यावर आंध्र प्रदेशामध्ये एनडीपीसीएस कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत. एक महिन्यांपूर्वीच तो जामीनावर सुटून आला होता. या आरोपींनी स्वतःची टोळी निर्माण करत वेगवेगळ्या राज्यामध्ये अवैध व्यवसाय करून समाजामध्ये दहशत निर्माण केली होती, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here